प्रतिनिधी / मिरज
येथील भारतीय तंतूवाद्य केंद्राचे युवा तंतुवाद्य कारागिर नईम नौशाद सतारमेकर यांनी संशोधनपूर्वक वैविध्यपूर्ण असा ‘श्री सरस्वती’ तानपुरा तयार केला आहे. भोपळ्याचा वापर न करता केवळ लाकडामध्ये हा तानपुरा तयार झाला आहे. यामध्ये तारा बदलून पुरुष आणि स्त्री गायकांसाठी या तानपुऱयाचा उपयोग करण्याची चांगली सोय करण्यात आली आहे. भोपळा नसल्याने वाहतुकीच्या दृष्टीनेही सहजपणे ने-आण करता येण्याजोगा आहे.
मिरज शहर हे तंतूवाद्य निर्मितीसाठी जगप्रसिध्द आहे. दीडशे वर्षांहून अधिक काळ या शहरात सतार, तानपुरा, दिलरुबा, वीणा, सारंगी यांसारखी तंतूवाद्ये तयार होतात. फरीदसाहेब सतारमेकर यांनी 1850 च्या सुमारास लावलेल्या तंतूवाद्य निर्मितीच्या रोपटय़ाचा आज वटवृक्ष झाला आहे. शनिवार पेठेत 25 हून अधिक दुकाने तंतूवाद्य निर्मितीत कार्यरत आहेत. त्यामध्ये अनेक कारागिर तंतूवाद्य निर्मिती करण्यात गढून गेलेली दिसतात. मिरज शहरात तयार होणाऱया तानपुऱयांना देशातीलच नव्हे तर परदेशातूनही मागणी आहे. नामवंत गायक-वादक मिरजेच्याच वाद्यांना पसंती देतात.
याच तंतूवाद्य कारागिरांनी पारंपारीक पध्दतीने तयार होणाऱया तंतूवाद्यामध्ये आजवर संशोधन आणि प्रयोग करुन वैविध्यपूर्ण अशी तंतूवाद्ये तयार केली आहेत. मिरजेतील युवा तंतूवाद्य निर्माते नईम सतारमेकर यांनी अशाच प्रयोगशिलतेतून ‘श्री सरस्वती’ तानपुरा तयार केला आहे. भोपळ्याचा वापर न करता केवळ लाकडात बनविलेला हा अनोखा तानपुरा आहे. नईम सतारमेकर हे फरीदसाहेब यांच्यानंतरच्या सहाव्या पिढीचे वंशज आहेत. त्यांचे आजोबा गुलाबसाहेब आणि वडील नौशाद सतारमेकर यांनी तंतूवाद्य निर्मितीत हातखंडा मिळविला होता. त्यांच्याच पाऊलावर पाऊल टाकून नईम सतारमेकर हे तंतूवाद्य निर्मिती करीत आहेत.
त्यांनी श्री सरस्वती तानपुरा करताना लाकुड खोदून सुमारे चार फुट लांबीचा तानपुरा बनविला आहे. यामध्ये भोपळ्याचा वापर करण्यात आला नाही. चार तारांचा या तानपुऱयासाठी गिटारीच्या चाव्या वापरण्यात आल्या आहेत. चार तारा काढून त्या लगेच बसविण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे पुरूष आणि स्त्री गायकांना तारांची अदलाबदल करुन आपल्या आवाजानुसार हा तानपुरा उपयोगात आणता येणार आहे. हा तानपुरा तयार करण्यासाठी सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लागला. या तानपुऱयाला काही नामांकीत गायकांनी पसंतीही दिली आहे. गेल्या तीन महिन्यात या तानपुऱयाची मागणी अनेक गायकांकडून होऊ लागली असल्याचे नईम सतारमेकर यांनी सांगितले.
पारंपारीक तानपुऱयामध्ये भोपळ्याचा वापर केल्यामुळे तो नाजूक असतो. त्याची वाहतूक करताना खुप काळजी घ्यावी लागते. मात्र, नईम सतारमेकर यांनी तयार केलेल्या श्री सरस्वती तानपुऱयामध्ये भोपळ्याचा वापर नसल्यामुळे वाहतुकीसाठी सुलभ झाला आहे. या नव्या तानपुऱयाच्या निर्मितीने मिरजेच्या तंतूवाद्य निर्मिती क्षेत्रात महत्त्वाची भर पडली आहे.








