साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई
मिरज / प्रतिनिधी
शहरातील सुभाषनगर परिसरासह तीन ठिकाणी घरफोडी करणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाला यश आले आहे. पोलिसांनी तिघा चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून 5 लाख, 69 हजार, 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बुधवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली.
श्रीशैल राम राजमाने (वय २९, रा. हुल्ले प्लॉट नंबर १४ सुभाषनगर), अनिस अल्ताफ सौदागर (वय २४, रा. शिंदे हॉल जवळ, सुभाषनगर) आणि अक्षय लक्ष्मण कांबळे (वय २६, रा सुभाषनगर, हुळे प्लॉट मिरज) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी आल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या तिघांना पकडले. सदर तिघांनी सुभाषनगर, अमननगर दत्त कॉलनी परिसरात तीन ठिकाणी घरफोडी करून चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून एक लाख, ८५ हजार रुपयांच्या चार सोन्याच्या पाटल्या, १ लाख, ६ हजारांचे सोन्याचे गंठण, सोन्याची साखळी, ९० हजारांचे सोन्याचे नेकलेस, ५४ हजारांचे सोन्याचे कानातील कर्णपुले व चेल त्यामध्ये झुबे, ६० हजार रुपयांचे डेल कंपनीचे दोन लॅपटॉप, ३० हजारांचा सॅमसंग कंपनीचा ४३ इंची एलईडी टिव्ही आणि ५० हजार रुपयांची एक हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल असा ५ लाख, ६९ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.