प्रतिनिधी/ मडगाव
बाणावली मतदारसंघात काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळणार अशी अपेक्षा बाळगून असलेल्या मिकी पाशेको यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाचा काल शनिवारी राजीनामा दिला. ते आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असून ते नुवे मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मिकी पाशेको यांनी दिल्लीत जाऊन मोठय़ा दिमाखात काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. बाणावली मतदारसंघातून चर्चिल आलेमाव यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची त्यांची तयारी होती. गेले काही दिवस ते बाणावलीत सक्रीय झाले होते. मात्र, काँग्रेस पक्षाने मिकींना बाजूला ठेवून तृणमूल काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून कार्यरत असलेल्या ऍथनी उर्फ टॉनी डायस यांना काँग्रेस पक्षात घेऊन अवघ्या 48 तासात उमेदवारी दिल्याने मिकी पाशेको संतप्त बनले होते.
मिकी पाशेको हे आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात असून या पूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आले होते. ते नुवे मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची माहिती पुढे आली आहे. बाणावली मतदारसंघात ते आपल्या मित्राला निवडणुकींच्या रिंगणात आणण्याची शक्यता आहे.









