मुंबई
पेमेंट क्षेत्रात कार्यरत जागतिक तंत्रज्ञान कंपनी मास्टरकार्डने आगामी काळात भारतातील लघु तसेच मध्यम उद्योगांना 250 कोटी रुपयांची मदत करण्याचे नुकतेच जाहीर केले आहे. कोरोनामुळे देशातील अनेक छोटे-मोठे उद्योग प्रभावित झाले असून त्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम दिसून आला आहे. अनेक उद्योगांना आर्थिक पाठबळाची गरज असल्याचे अभ्यासात जाणवले आहे. मास्टर कार्डने लघु व मध्यम उद्योजकांसाठी मदत करण्याचे निश्चित केले आहे. यासाठी मास्टरकार्डने विविध योजना आखल्या आहेत, ज्यांचा छोटे छोटे व्यापारी, किराणा दुकानांनाही लाभ उठवता येणार आहे. व्यवसायातील महिलांनाही अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने मास्टरकार्ड त्यांना मदत करणार आहे. संपर्क जाळे विकसित करून माहिती तंत्रज्ञानाच्या आधारावर भागीदारीतून उद्योगांना व्यवसायात प्रगती साधता यावी यासाठी मास्टरकार्ड पुढाकार घेणार आहे. छोटे व्यापारी भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्वाचे घटक आहेत. त्यांना सध्या मदतीची गरज आहे, ज्यायोगे ते व्यवसायात प्रगती साधू शकतील. सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या एकूण वाटय़ात छोटय़ा व्यावसायिकांचा वाटा 35 टक्के इतका आहे.