दवर्लीतील शिबिरात डॉ. काजल नाईक यांची माहिती
प्रतिनिधी /फातोर्डा
स्तनांचा कर्करोग हा आजकाल सर्रास होणारा आजार आहे. प्रत्येक आठ महिलांमागे एका महिलेत हा कर्करोग आढळतो. यास जाडेपणा, बदललेली जीवनशैली, धुम्रपान, मद्यपान, अनुवांशिकता अशी अनेक कारणे आहेत. मासिक पाळी बंद झाली की, या कर्करोगाचा धोका जास्त संभवतो, असे कर्करोगतज्ञ डॉ. काजल नाईक यांनी दवर्ली दिकरपाली पंचायत सभागृहात मार्गदर्शन करताना दिला.
सुरुवातीला पहिल्या स्तरावर याचा जास्त त्रास होत नाही. केवळ स्तनात दुखणे, त्यातून पांढरा द्रव निघणे, हाताला न लागणारी गांठ असणे अशी लक्षणे दिसतात, ज्याकडे कित्येक महिला दुर्लक्ष करतात. त्यामुळे आजार बळावतो व दुसऱया स्तरावर पोहोचतो. लहान चण्याएवढी असलेली गांठ अक्रोडाएवढी मोठी होते, जी हाताला लागते. अशा वेळी लगेच डॉक्टरकडे जाऊन चाचणी करून घ्यावी. त्यामुळे त्वरित उपचार सुरू करता येतात, असा सल्ला डॉ. नाईक यांनी दिला.
युवराज सिंग फाऊंडेशन, दवर्ली दिकरपाली पंचायत आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ मडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्तनांच्या कर्करोगाची चिकित्सा आणि होमिओपॅथी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी होमिओपॅथिक डॉ. नवदीप शिरोडकर तसेच डॉ. दानडेलिया रॉड्रिग्स, डॉ. काजल नाईक, रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष साहिल गोसालिया, सचिव अनीश अग्नी, खजिनदार प्रतीक्षा मयेकर, विधी गोसालिया, यश मेवाडा, किरण कारेकर, प्रथम शहा, सोनिया तळेकर यांची उपस्थिती होते.
पुढे बोलताना डॉ. काजल नाईक म्हणाल्या की, युवराज सिंग फाऊंडेशनतर्फे आता पर्यंत 38000 महिलांची चाचणी केली गेली आहे. कर्करोग आढळलेल्या महिलांना पुढील चाचणीसाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, साखर, मीठ व मैदा हे पांढरे विष असून ते टाळा. डॉ. नवदीप शिरोडकर यांनी रक्तदाब तपासणी केली व समस्या, आजार जाणून घेऊन मार्गदर्शन केले तसेच मोफत औषधे दिली. या शिबिराचा लाभ 56 पेक्षा जास्त लोकांनी घेतला.









