प्रतिनिधी / कोल्हापूर
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शहरातील माळकर तिकटी ते मटण मार्केट या मार्गावर दुकानासमोरील लावण्यात आलेल्या शेडस्वर सोमवारी दुपारी कारवाई केली. 38 दुकांनासमोरील शेडस् काढण्यात आली. या शेडस्मुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. कारवाईनंतर या मार्गावरील वाहतुकीची कोंडी फुटण्यास मदत झाली.
शहराच्या मध्यवस्तीत असणाऱया माळकर तिकटी ते मटण मार्केट मार्गावर प्रचंड वाहतूक असते. या ठिकाणी केएमटीचा थांबा आहे. त्याचबरोबर वडापच्या रिक्षाही या ठिकाणी लागत असतात. नागरी वस्तीबरोबर दवाखाने, विविध व्यवसायाची दुकाने, मटण मार्केट, स्क्रॅप मार्केट, शिक्षण उपसंचालक कार्यालय आदी या ठिकाणी असल्याने प्रचंड रहदारी, वाहतूक या परिसरात असते. त्यामुळे माळकर तिकटी ते खाटीक चौक मार्ग नेहमीच गजबजलेला असतो. या रस्त्यावर असणाऱया पैकी काही दुकानदार आपल्या दुकानासमोर वस्तू ठेवत असतात, शेड मारून रस्ता व्यापून व्यापार करत असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याने अपघाताचीही शक्यता वाढली होती. या प्रकाराबद्दल महापालिकेकडे असंख्य तक्रारीही दाखल झाल्या होत्या.
त्याची दखल घेत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी कारवाईचे आदेश दिले. सोमवारी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाई केली. इस्टेटचे अधिकारी सचिन जाधव, अतिक्रमण निर्मूलन पथकाने प्रमुख पंडीत पोवार यांच्या पथकाने कारवाई करत 38 शेडस्, छपऱया काढल्या. काही मालकांनी स्वतःहून शेडस्, छपऱया काढून घेतल्या. यावेळी दुकानासमोर लावण्यात आलेले खाटही काढण्यात आले. पथकात सज्जन नागलोत, मुकादम रविंद कांबळे यांच्यासह कर्मचाऱयांचा समावेश होता.









