अडीच महिन्यानंतर उलगडा, 9 जणांना अटक, 8 लाखांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी / बेळगाव
एका ब्रम्हचाऱयाची मालमत्ता हडपण्यासाठी अडीच महिन्यांपूर्वी त्याचे अपहरण करुन खोटी कागदपत्रे तयार करुन जमीन हडपण्याच्या प्रयत्नात असलेल्या 9 जणांच्या एका टोळीला मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. अडीच महिन्यांपूर्वी झालेल्या बेपत्ता प्रकरणाला कलाटणी मिळाली असून कडलगे (ता. गडहिंग्लज) येथे छापा टाकून अपहृत ब्रम्हचाऱयाची सुटका करण्यात आली आहे.
मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमनी, पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर, एम. एस. वटारे, शंकर पाटील, नवीन कुमार, अनिल, बसवराज करोशी, महेश कौजलगी, एस. बी. खानापूरे, एल. एस. कडोलकर, एस. टी. तेली, आशीर जमादार, विश्वनाथ माळगी, एम. एस. चावडी, विरुपाक्षी बुदण्णावर आदींनी ही कारवाई केली आहे.
पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार, उपायुक्त सीमा लाटकर व यशोधा वंटगोडी यांनी पोलीस पथकाचे कौतुक केले आहे. लॉक डाऊननंतर त्या ब्रम्हचाऱयाच्या जीवाला इजा पोहोचविण्याचाही धोका होता. त्याआधीच पोलिसांनी कडलगे (ता. गडहिंग्लज) येथे कारवाई करुन अपहरण प्रकरणाचा छडा लावला आहे व अपहृत ब्रम्हचाऱयाची सुटका केली आहे.

23 फेब्रुवारी रोजी भांदुर गल्ली येथील अण्णासाहेब श्रीकांत चौगुले (वय 40) हे बेपत्ता झाले होते. यासंबंधी दि. 25 फेब्रुवारी रोजी अण्णासाहेब यांचे काका जयंत बाबुराव चौगुले (वय 82, रा. रानडे रोड, टिळकवाडी) यांनी मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. 23 फेब्रुवारीच्या सकाळपासून अण्णासाहेब आपल्या घरी आले नाहीत. त्यामुळे त्यांचे कुटुंबिय धास्तावले होते.
बेपत्ता अण्णासाहेब कडलगे (ता. गडहिंग्लज) येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकुन सहा जणांना अटक केले व त्यांच्या तावडीतुन अण्णासाहेब यांची सुटका करण्यात आली. अण्णासाहेब यांनी वेगवेगळय़ा सोसायटय़ांत ठेवलेले डिपॉजीट काढुन घेण्यासाठी स्लीपवर त्यांच्या सह्या घेण्यात येत होत्या. त्यावेळी पोलिसांनी सहा जणांना अटक करुन त्यांना बेळगावला आणले. त्यांची कसुन चौकशी केली असता एकूण 9 जणांची ही टोळी असल्याचे उघडकीस आले.
या 9 जणांना अटक करुन त्यांच्या जवळून अपहरणासाठी वापरण्यात आलेले एमएच 02 बीपी 4502 क्रमांकाची कार, पाच मोटार सायकली, 11 मोबाईल संच असा एकूण आठ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अण्णासाहेब यांच्या सर्व्हे क्रमांक 1132, 1137 या जमिनी संबंधीचे जीपीए दस्ताऐवज, सह्या घेतलेल्या स्लीपा जप्त करण्यात आल्या आहेत.
जीवालाही होता धोका
अपहृत अण्णासाहेब यांची शुक्रवारी रात्री सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. ते ब्रम्हचारी आहेत. त्यांचे आई-वडिलांचे निधन झाले आहे. त्यांच्या तीन बहिणींचेही निधन झाले आहे. त्याही ब्रम्हचारी होत्या. ही गोष्ट लक्षात आल्याने मालमत्ता व त्यांच्या बँक खात्यातील रक्कम हडपण्यासाठी त्यांचे अपहरण करण्यात आले होते, असे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. सध्या वेगवेगळय़ा सोसायटय़ा व बँकेत ठेवलेली रक्कम काढुन घेवून लॉकडाऊननंतर त्यांच्या जमिनीचाही व्यवहार करण्यात येणार होता व काम फत्ते झाले की अण्णासाहेब यांच्या जीवाला धक्का पोहोचविण्याचा अपहरणकर्त्यांचा बेत होता. मात्र त्याआधीच पोलिसांनी या टोळीच्या मुसक्मया आवळल्या आहेत.
फामहाऊसवर 40 दिवस ठेवले
भांदुर गल्ली येथून 23 फेब्रुवारी रोजी सकाळी नाष्टा आणण्यासाठी अण्णासाहेब देशपांडे पेट्रोल पंपजवळ आले होते. त्यावेळी चौघा जणांनी कारमधून त्यांचे अपहरण केले. हलगा, हिंडलगा, उचगाव मार्गे त्यांना कडलग्याला नेण्यात आले. दुसऱया दिवशी बेळवट्टी येथील एका फामहाऊसवर नेण्यात आले. तेथे 40 दिवस कोंडून ठेवण्यात आले होते. कडलगे (ता. गडहिंग्लज) येथील सुरेश पाटील यांच्या घरीही कोंडून ठेवण्यात आले होते. सुरेश हे मुंबईत होमगार्ड म्हणून ते काम करतात. ते सध्या रजेवर गावी आले आहेत. 3 एकरची मिळकत व लाखो रुपये हडपण्यासाठी या टोळीने अण्णासाहेब यांचे अपहरण केले होते. यासंबंधी मार्केट पोलीस स्थानकात भा.दं.वि. 143, 147, 365, 384, 120(बी), 344, 323, 504, 506 सहकलम 149 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.









