प्रतिनिधी/ बेळगाव
हिंडलगा ग्राम पंचायत हद्दीतील विजयनगर येथील मालमत्तेच्या मालकी हक्काची नोंद कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालानुसार व कायद्याच्या चौकटीत करण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण हिंडलगा गावचे तलाठी डी. ए. कुगजी यांनी दिले आहे. डायरी मंजुरीसाठी आम्ही कोणत्याही प्रकारची रक्कम घेतली नसल्याचे म्हणणे प्रसिद्धीपत्राद्वारे दिले आहे.
हिंडलगा- विजयनगर येथील मालमत्तेच्या मालकी हक्काबाबत वाद सुरू आहे. याबाबत न्यायालयात वाद सुरू असून मिळकतीवर मालकी हक्काची नोंद करण्यात आली आहे. मात्र सदर नोंद करण्यासाठी उचगाव सर्कलने दोन लाख रूपये घेतल्याची तक्रार जिल्हाधिकारी, प्रादेशिक आयुक्त, व लोकायुक्तांकडे करण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे स्पष्टीकरण सादर करण्यात आले आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालाच्या आधारे व सरकारी वकीलांकडून घेण्यात आलेल्या सल्ल्यानुसार कायद्याच्या चौकटीत मिळकतीवर मालकाचे नाव नोंदविण्यात आले आहे. उच्च न्यायालयापर्यंत सर्व दाव्यांमध्ये अपयश आले असून, उच्च न्यायालयात माफी मागून दंड भरण्याची वेळ वादींवर आली आहे. त्यामुळेच वैफल्यग्रस्थ अवस्थेत अधिकाऱयांवर चिखलफेक करण्याचा प्रकार वादींनी केला आहे. सदर तक्रार खोटी असल्याचे म्हणणे महसूल निरीक्षक व ग्राम तलाठय़ांनी लेखी पत्राद्वारे सादर केले आहे.









