पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची ग्वाही
वार्ताहर/ मार्गताम्हाणे
कोकणात रोजगार निर्मिती करण्यासाठी मार्गताम्हानेत प्रस्तावित टेक्स्टाईल्स पार्कच्या उभारणीसाठी उद्योगमंत्री व पालकमंत्र्यांसमवेत लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही युवासेना प्रमुख व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी रामपूर येथे शनिवारी आयोजित सुवर्णभास्कर नोकरी महोत्सवात दिली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रामपूर एज्युकेशन सोसायटीच्या मैदानावर आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कोरोनानंतरची परिस्थिती लक्षात घेता हा नोकरी महोत्सव बेरोजगारांसाठी फार महत्वपूर्ण आहे. जाधव यांनी या महोत्सवातून 6 हजार कुटुंबाची चूल पेटवली आहे. महोत्सवासाठी झालेली विक्रमी नोंदणी लक्षात घेता आता हे चित्र बदलण्याची गरज आहे. तरूणांनी 2 महिने नोकरी केल्यानंतर ती सोडून दुसऱया नोकरीच्या मागे लागू नये. तरूणाईचे एका दगडावर पाय ठेऊन यशस्वी होण्यासाठी धडपड केली पाहिजे. कोणत्याही कंपनीत काम करताना आपल्याली एका कंपनीचा मालक होण्याचे ध्येय ठेऊन काम करा, असा सल्लाही त्यांनी तरूणांना दिला. कोकणात पर्यटन आणि त्यातून रोजगाराला मोठा वाव असल्याने पर्यटनवाढीसाठी प्रयत्न सुरु आहेतच, शिवाय टेक्सटाईल्ससारखे प्रकल्प येणे आवश्यक आहे. येथील तरुणांना आपल्या भागातच रोजगार मिळू शकेल, असा आमचा प्रयत्न आहे. येथे प्रस्तावित प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्री, पालकमंत्र्यांची बैठक घेऊन यावर ठोस निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री अनिल परब म्हणाले की, आमदार जाधव यांनी नोकरी महोत्सवातून 6 हजार लोकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. या माध्यमातून शिवसेनेचे नाव घरोघरी पोहोचवण्यास त्यांचा मोठा हातभार लागला आहे. आमदार भास्कर जाधव म्हणाले की, आपण पालकमंत्री असताना याच ठिकाणी घेतलेल्या नोकरी महोत्सवाला असाच प्रतिसाद लाभला होता. रामपूर भागात प्रस्तावित टेक्सटाईल्स प्रकल्पामुळे येथील पर्यावरण, शेती व फळलागवडीला कोणताही धोका पोहोचणार नाही, याची काळजी घेऊनच हा प्रकल्प येथे आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याला मूर्त स्वरुप आणण्यासाठी युवा नेते आदित्य ठाकरे यांनी लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली.
नोकरी महोत्सवाचे आयोजक विक्रांत जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, या महोत्सवात 14 दिवसांत 11 हजार ऑनलाईन अर्ज आले. इतक्या प्रमाणात रोजगाराची आवश्यकता असून लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला ही भूषणावह बाब नाही. लॉकडाऊन काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात अनेक कंपन्या आणल्या. कोकणातही अशाच कंपन्यांची गरज आहे. यावेळी आमदार शेखर निकम, योगेश कदम यांनीही मार्गदर्शन केले. व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, उपाध्यक्ष महेश नाटेकर, शिक्षण सभापती सुनील मोरे, जिल्हाप्रमुख सचिन कदम, विलास चाळके यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सभापती उपस्थित होते. सूत्रसंचालन वैभव पवार, फैसल कास्कर यांनी केले.









