कंग्राळी खुर्द : येथील मार्कंडेय युवक संघाचा 51 वा तर मार्कंडेय व्यायाम मंदिराचा 27 वा वर्धापन दिन विजयादशमीच्या मुहूर्तावर मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. रविवार दि. 25 रोजी व्यायाम शाळेच्या सभागृहात आयोजित समारंभाच्या अध्यक्षस्थानी व्यायाम मंदिराचे अध्यक्ष प्रकाश गंगाराम पाटील होते.
यावेळी मरगाई मंदिराचे पूजन मार्कंडेय युवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश धामणेकर यांनी तर मंदिराचे पूजन मार्कंडेय व्यायाम मंदिराचे सचिव रणजित कृष्णा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. व्यायाम शाळेतील हनुमान प्रतिमेचे पूजन अध्यक्ष प्रकाश गंगाराम पाटील यांनी केले. मार्कंडेय व्यायाम मंदिराच्या नामफलकाचे पूजन विलास जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. माजी अध्यक्ष बाबू पावशे यांनी श्रीफळ वाढविले. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन किसन पाटील यांनी केले. यावेळी मार्कंडेय युवक संघाचे बी. एन. पुजारी, बी. डी. मोहनगेकर, मार्कंडेय व्यायाम मंदिराचे माजी अध्यक्ष आर. आय. पाटील, सुहास पाटील, प्रभाकर जाधव, बाल हनुमान तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रशांत गोपाळ पाटील, सुशांत जाधव, मनोहर पाटील, प्रशांत निलजकर, सागर पाटील यांच्यासह मार्कंडेय युवक संघाचे व्यायाम मंदिराचे सदस्य ग्रामस्थ, व्यायाम पटू, पैलवान बंधू व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.