‘आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा’ ही जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली कविता मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱया दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा एक भाग आहे. साताऱयापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या एका गावातल्या शाळेमधील विद्यार्थ्याना ‘दहावीचा अभ्यास कसा करावा’, या विषयावर मी त्यांच्याशी संवाद साधत होतो. त्यावेळी त्यांच्या पुस्तकातील ही कविता कोण म्हणून दाखवणार, असा प्रश्न मी विचारला. त्यावर एका मुलीने ही कविता वाचून दाखवली. “ती कविता कशाबद्दल आहे?’’, असा प्रश्न विचारल्यावर बऱयाच मुलांनी “ती कविता एका पक्ष्याचे वर्णन आहे.’’ असे सांगितले. “हे गाणे ऐकले आहे का?’’ या माझ्या प्रश्नावर सगळ्याच विद्यार्थ्यांनी नकारार्थी मान हलवली. त्यावेळी हे माझ्यासाठी धक्कादायक होते. ‘आराम हराम आहे’ चित्रपटातील गाणे त्यांना ऐकवले आणि दाखवले. ते गाणे लॅपटॉपवर बघताना वर्गातल्या सर्व मुला-मुलीना ‘फारच भारी’ वाटले. चित्रपटातील गाणे बघितल्यानंतर काही मुलांनी सांगितले की तो घर सोडून चालला आहे. त्यानंतर वडलोपार्जीत घर सोडून स्वतः काही काम करणे आणि ‘सोडी सोन्याचा पिंजरा’ याची सांगड घातल्यानंतर सगळ्याना कविता आवडली आणि अर्थही समजला. शाळेमधून निघताना मराठी शिक्षकांना याबद्दल सांगितल्यावर ते म्हणाले, “सिनेमातली गाणी आम्ही शाळेत दाखवत नाही.’’ एखाद्या कृतीमुळे अभ्यासाची आवड लागणे महत्वाचे की माध्यम महत्वाचे? आता घराघरामध्ये रेडियो लावला जात नाही त्यामुळे घरातील सर्वांनी ठराविक वेळेला ऐकणे शहरातच नव्हे तर खेडेगावातही बंद होण्याच्या मार्गावर आहे. मोबाईल हातात आहेत परंतु त्यावर नेमके काय ऐकायचे/बघायचे याबद्दल सांगणारे कमी आहेत. त्यामुळे अशी गाणी विद्यार्थ्याना ऐकवायला हवीत. कारण, मूळ प्रश्न कविता समजून घेण्याबद्दल आहे. काही शाळांमध्ये ती इतकी निरस पद्धतीने शिकवली जाते की विद्यार्थ्याना कविता शिकावी असे वाटत नाही. कविता छंदात वाचली जात नाही आणि त्याचे गाणे झाले तर अनेक शाळांमध्ये ती ऐकवणे हे अभ्यासक्रमाबाहेरचे वाटते. विशेष म्हणजे ही अवस्था मराठी माध्यमातील मराठीच्या पुस्तकाबद्दल. इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांचे मराठी भाषा शिकण्याचे प्रश्न वेगळेच आहेत. पु. ल. देशपांडे यांचा ‘उपास’ हा ‘बटाटय़ाच्या चाळीतला’ लेख, धडा या स्वरूपात त्यांच्या अभ्यासक्रमाचा एक भाग आहे. इतका फर्मास लेख त्यातले संवाद स-अभिनय वाचल्यास समजू शकेल परंतु विद्यार्थ्यांचे एकूणच वाचन कमी असल्यामुळे आणि क्रमिक पुस्तक-गाईडच्या बाहेरचे अवांतर वाचन शून्य असल्यामुळे त्या लेखातल्या शाब्दिक कोटय़ा बऱयाच विद्यार्थ्यांना समजत नाहीत. किती इंग्रजी माध्यम असलेल्या शाळांमध्ये हा ‘धडा’ स-अभिनय वाचून दाखवला जातो आणि त्यातल्या विनोदावर सगळा वर्ग खळखळून हसतो, हा प्रश्नच आहे. ज्यांनी पु. ल. देशपांडे वाचले त्या वाचकांना ही वस्तुस्थिती नसून मी ‘पराचा कावळा’ करतो आहे असे वाटेल. यासाठी वाचकांनी कोणत्याही इंग्रजी माध्यमात शिकणाऱया विद्यार्थ्याला ‘वीट येणे’ सारख्या काही शाब्दिक कोटय़ा ऐकवून याची खातरजमा करून घ्यावी.
पुणे-मुंबईसारख्या शहरातील इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्याना मराठी हा विषय अभ्यासक्रमात आहे का? असे विचारल्यावर, फारच नाराजीने ते होकारार्थी उत्तर देतात. कारण त्यांच्यासाठी हा ‘जुलमाचा रामराम’ आहे. मुलांना मराठी वाचनाची आवड नाही, म्हणून उच्च मध्यमवर्गीय पालक घरामध्ये मराठी वृत्तपत्र घेत नाहीत. घराजवळच्या वाचनालयात, ज्याला आपण मराठीत ‘लायब्ररी’ म्हणतो तिथे नाव घालून मराठी-इंग्रजी पुस्तके प्रत्येक आठवडय़ाला बदलून आणणे, वाचणे आणि वाचलेल्या नवीन पुस्तकाबद्दल घरी चर्चा करणे किती घरातील पालक करतात हा मोठाच प्रश्न आहे. इंग्रजी वाचनाबरोबर मराठी पुस्तके किती घरी विकत आणली जातात? किती शाळांमध्ये वाचनालये जिवंत आहेत? शाळेच्या वाचनालयामधून नियमितपणे पुस्तके बदलून वाचणाऱया विद्यार्थी-विद्यार्थीनी शोधून त्यांचा जाहीर सत्कार करणाऱया शाळा किती आहेत? या प्रश्नांच्या उत्तरामध्ये ‘मुलांना मराठी विषयाची आवड का नाही?’ या प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे. शहरापासून चाळीस-पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या गावातील विद्यार्थ्याना इंग्रजी अवघड जाते आणि पुस्तकातले मराठी समजत नाही, अशी दुहेरी अडचण आहे. अनेक शाळांमध्ये हुशार विद्यार्थी-विद्यार्थिनींना इंग्रजी माध्यमात/ सेमी इंग्रजी माध्यमात आणि मार्कांच्या स्पर्धेत मागे असलेल्यांना मराठी माध्यमात प्रवेश दिला जातो. मराठी, सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यम या संकल्पनेचा ज्या प्रश्नातून जन्म झाला त्यापासून आताची जी परिस्थिती झाली आहे, त्याचे वर्णन ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ असे करता येईल. इंग्रजी शिकणे गरजेचे आहे पण मातृभाषेबद्दल प्रेम असल्याशिवाय दुसरी भाषा शिकण्याची इच्छा अशी होईल?
यासाठी आपण काय करू शकतो?
जुनी-नवी मराठी-इंग्रजी पुस्तके दरमहा ठराविक रक्कम बाजूला ठेवून विकत घ्यावीत. पुस्तके वाचणारे पालक घरामध्ये असतील तरच मुलांना भाषेची आवड लागू शकते. वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा, काय आवडले, कोणत्या लेखक-लेखिकेची शैली जुनी वा कंटाळवाणी आहे इथपासून कोणाचे पुस्तक भराभर वाचून होते मतमतांतरे असलेली चर्चा घरोघरी होणे गरजेचे आहे.अनेक वृत्तपत्रातील मराठी शब्दकोडी पालकांनी पाल्यांच्या सोबत वेळ घालवून सोडवावीत. ‘बुडत्याचा पाय खोलात’, ‘काखेत कळसा, गावाला वळसा’ म्हणजे काय हे पालकांनी मुलांना सांगावे, कारण आता कळशी घराघरात दिसत नाही. मुख्य म्हणजे मराठी कच्चे आहे म्हणून मराठीचा क्लास न लावता, आई आणि वडील या दोघांनी प्रत्येकी किमान एक तास दररोज पाल्यांसाठी राखून ठेवावा.
पुस्तक वाचनाचे ऑडियो उपलब्ध आहेत. त्याचे श्रवण शिक्षक पालकांनी एकत्रितपणे करावे. (हे सर्व मी ऐकलेले आहे, असा अविर्भाव आणून शिक्षकांनी त्यावेळी इतर कामे करू नयेत.)
कोणत्याही शाळेचे मूल्यमापन करताना शाळेची लायब्ररी जिवंत आहे का, यासाठी मार्कांची तरतूद असावी. लॉकडाऊननंतर शाळा सुरु झाल्या अजूनही अनेक शाळात लायब्ररी सुरु झालेली नाही, अनेक शाळांच्या लायब्ररीमध्ये पुस्तके मुलाना सहजगत्या उपलब्ध नाहीत. एक पुस्तक वाचून त्यातला सारांश (घोकंपट्टी न करता) सांगणाऱया मुलांच्या खात्यात एक रुपया देण्याचा उपक्रम पाउलवाट फाउंडेशनचे आशिष क्षीरसागर पासली या दुर्गम भागातल्या शाळेत राबवतात. त्याचे अनुकरण प्रत्येक शाळा करू शकते. संवाद कसा स-अभिनय वाचावा, मुलाखत कशी घ्यावी/द्यावी, विनोदी पुस्तकाचे वाचन कसे करावे अशा विविध विषयांना स्पर्श करणारी वाचन स्पर्धा शाळा घेऊ शकतात.
शाळेत प्रवेश करताना मराठी-इंग्रजी वृत्तपत्रे काही डेस्कवर मुलांसाठी उपलब्ध असावीत. प्रार्थनेच्या वेळी एक बातमी एका विद्यार्थ्याने वाचून दाखवण्याने शालेय दिवसाची सुरुवात होऊ शकते. यामध्ये वाचनासाठी फक्त हुशार उर्फ शिक्षकांच्या आवडत्या विद्यार्थ्यानाच निमंत्रीत करू नये, सर्वांना समान संधी मिळावी.
मराठी वेगवेगळ्या लहेजामध्ये कशी बोलली जाते याचा व्हिडियो शाळेत सर्वाना दाखवावा.
मराठीमध्ये गोष्ट सांगण्याची स्पर्धा विद्यार्थी आणि शिक्षकांसाठीसुद्धा असावी. उत्तम गोष्ट सांगणाऱया शिक्षकाची निवड विद्यार्थ्यांनी गुप्त मतदान पद्धतीने करावी. प्रत्येक गोष्ट ऐकल्यानंतर ‘आपण यामधून काय शिकलात’ असा प्रश्न कधीही विचारू नये. मराठी माध्यमाच्या दहावीच्या पुस्तकात पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या ‘उपास’ या ‘धडय़ा’खाली एक प्रश्न विचारला आहे. ‘पाठातील तुम्हांला सर्वांत आवडलेला विनोद कोणता? तो का आवडला ते स्पष्ट करा.’ विनोद का आवडला हे लिहिण्यापेक्षा विनोद सांगण्याची स्पर्धा आयोजित केली तर स्पर्धक आणि ऐकणारी मुलेही हा धडा मनापासून वाचतील. कोणताही विनोद का आवडला याची पाच शास्त्राrय कारणे लिहिल्यामुळे मराठीची गोडी लागेल की विनोदाचा वीट येईल?
– सुहास किर्लोस्कर








