मुलांच्या कर्णबधीरतेवर आईची आर्त हाक : समाजाला लिहिले हृदयस्पर्शी पत्र : व्हाटस्ऍप, फेसबूकवर पत्र व्हायरल
तेजस देसाई / दोडामार्ग:
वार शनिवार…… वेळ सकाळची. मोबाईल वरील व्हाट्सऍपचे मेसेज बघण्यासाठी डाटा ऑन केला. त्यामध्ये एका आईचे मुलाचे ऐकू येण्यासाठी आलेले पत्र अक्षरश: बधीर करून गेले. पत्र वाचून झाल्यावर स्तब्ध झालो. एखादी आई ज्यावेळी असं खुलं पत्र लिहायला घेते ना त्यावेळी तिच्या मनाची काय अवस्था झाली असेल ? या विचाराने सुन्न झालो. साहाजिकच आपणही या मुलाची व्यथा वाचकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने ही बातमी लिहीत आहे. हे लिहिताना मला खात्री वाटते की, समाजातील अनेक दानशूर या शाळकरी मुलाच्या मदतीला पुढे येतील आणि एका आईची आर्त हाक आपल्या आईच्या हाकेप्रमाणे झेलतील. चला या पत्राचा सविस्तरपणे उलगडा करूया.
हा विषय खूप हृदयस्पर्शी आहे. आपण आपल्या घरात होईल तेवढे ऍडजेस्टमेंट करीत असतो. पण, एखादा आजार, आपत्कालीन प्रसंग आल्यावर जी त्रेधातिरपट उडते ना ती काय करावं हे या प्रश्नाचे उत्तर सहसा देत नाही. सासोली येथील नारायण प्रकाश ठाकुर (आठवी) यांच्या कर्णबधीर व्यंगामुळे ठाकुर कुटुंब हतबल झाले आहे. सुरुवातीच्या काळात सात ते आठ लाख रुपये नारायणला ऐकू येण्यासाठी खर्च करण्यात आले. जन्मत: कर्णबधीर असलेल्या नारायणला प्रोसेसर बसवण्यात आला. तो इतर मुलांप्रमाणे क्रिया करू लागला. कुटुंब हसले, समाधानी झाले. या खर्चापर्यंत अनेकांनी मदत केली तर कुटुंबाने कर्ज काढले आणि हा टप्पा पार पडला. मात्र, आता कानांचा हा प्रोसेसर बंद पडला असून तो दुरुस्तीच्या (पैशांअभावी) प्रतीक्षेत आहे. त्यामुळे आईने अखेरचा पर्याय म्हणून समाजाला हाक दिली आहे. व्हाट्सऍपवर माऊलीचे पत्र पाहिल्यावर मी फोन केला. त्या माऊली एका बँकेत कर्ज विचारण्यासाठी आल्या होत्या. त्यांच्याकडून छोटय़ाची माहिती घेतली. त्यांची धडपड पाहता, माया मंदिर हलले, लागे कळस फुटाया किंवा देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला, म्हणेन प्रभू रे माझे सारे जीवन देई मम बाळाला’ हा हृदयस्पर्शी आई-लेकराची भावना प्रकट करणाऱया गीतांप्रमाणे वास्तवात दिसत होती. आईची विनवणी व मुलाच्या उज्वल भविष्यासाठी ओंजळीत जमेल तेवढे दान टाकणे आवश्यक आहे.
आई पत्रात म्हणते…
आपल्या मुलाला ऐकू यावे, यासाठी गेली सात वर्षे आपण नानातऱहेचे प्रयत्न करीत आहे. ऑपरेशन होऊन कानाला प्रोसेसर लावण्यात आला. मात्र, तो खराब झाला. त्याची दुरुस्ती महाग असून साधारण 70 ते 80 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. याचा तपशीलवार खर्च तिने पत्रात लिहिला आहे. त्याच्या वडिलांची लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली. शिवाय नारायण आठवीत गेल्यामुळे त्याला ऐकू येणे शिक्षणासाठी महत्त्वाचे आहे. गेल्या आठ महिन्यांपासून मुंबई येथे एका कंपनीत प्रोसेसर दुरुस्तीच्या पैशाअभावी पडून आहे. 12 सप्टेंबरला आपल्याला तो न्यायला बोलविले आहे. मात्र जाऊ कशी, एक आई म्हणून ‘प्लीज’, विनंती करते मला मदत द्या. तुमचे उपकार मी कधीही विसरणार नाही’. असेही म्हटले आहे. या कुटुंबियांचा संपर्क क्रमांक 9422740112 असा आहे.
खाते – सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सिंधुदुर्ग, शाखा दोडामार्ग. खाते क्रमांक 024400000011919, आयएफसी कोड-एचडीएफसीओसीएसआयएनडीसी









