नवी दिल्ली
अमेरिकन टेक कंपनी मायक्रोसॉफ्ट कॉर्पने कोरोना महामारीच्या संकटात जवळपास 249 देशातील तीन कोटी लोकांना डिजिटल कौशल्य प्रशिक्षण प्राप्त करण्यासाठी मदत केली आहे. यामध्ये जवळपास 30 लाख लोक हे एकटय़ा भारतामधील असल्याची माहिती कंपनीने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
मायक्रोसॉफ्टच्या माहितीनुसार कंपनीकडून जागतिक पातळीवर जवळपास 2,50,000 कंपन्यांना 2021 मध्ये कौशल्यावर आधारीत नियुक्ती करण्यात मदत झाली आहे. महामारीच्या दरम्यान बेरोजगार झालेले कारखान्यातील कामगार, किरकोळ क्षेत्रातील सहाय्यक आणि ट्रक चालकासह लाखो लोकांनी गिटहब, लिंक्डइन आणि मायक्रोसॉफ्टच्या ऑनलाईन प्रशिक्षण उपक्रमाचा लाभ घेतल्याचे दिसून आले. मायक्रोसॉफ्टने भारतातील अनेकांना कौशल्य आधारीत प्रशिक्षण देण्यासाठी सरकार, औद्योगिक संघ आणि बिगर नफा भागीदार यांची मदत घेतली आहे. अनेकांना प्रशिक्षीत करून त्यांना रोजगारक्षम बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मागच्या वर्षी मायक्रॉसॉफ्टने भारतामध्ये राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) यांच्यासोबत हात मिळविलेला होता. यांच्या सहकार्याने देशभरात कुशल नसलेल्या जवळपास 1 लाख युवतींना डिजिटल कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे.
जगभरातील लोकांना होणार लाभ
कोरोना महामारीनंतर जगभरात कौशल्यावर आधारीत नवीन संकल्पना राबविण्यावर भर दिला जाणार आहे. देशासह जगभरातील लोक कोरोनाच्या कालावधीत प्रभावीत झाले असून त्यांना कौशल्य प्रशिक्षण देणे अत्यंत महत्त्वाचे ठरणारे असणार आहे. याचा लाभ त्यांना स्वरोजगारासाठी किंवा नोकरीसाठी होऊ शकतो असे आशियाचे अध्यक्ष अहमद यांनी सांगितले आहे.









