आज, उद्या विजांच्या गडगडाटासह पाऊस
प्रतिनिधी /पणजी
आज व उद्या दोन दिवस राज्यात विजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गेल्या 24 तासात सांखळीत सव्वा इंच पाऊस पडला आहे. मंगळवारी दुपारपासून सत्तरी तालुक्याला पावसाने झोडपून काढले. अनेक तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. पणजीत मात्र किंचित पावसाच्या सरी पडून गेल्या.
मान्सूनोत्तर पावसाचा जोर पुन्हा वाढणार असून येत्या 10 ऑक्टोबरपर्यंत राज्यात सर्वत्र मध्यम तथा हलक्या स्वरुपात पाऊस पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. सध्या पडणारा पाऊस गोव्याच्या पूर्व भागातून येत आहे. विशेषतः सत्तरी, सांगे या भागातील डोंगराळ परिसरात व घाट माथ्यावर तसेच पायथ्याशी जोरदार पाऊस पडत आहे. या पावसाचा फार मोठा फटका गोव्याच्या पश्चिम भागाला जाणवत नाही. मात्र सत्तरी पेडणेचा बराचसा भाग सांखळी, धारबांदोडा, फोंडा, मोले, कुळे, सांगे इत्यादी परिसरात जोरदार पाऊस पडून जातो. कानठळय़ा बसतील एवढा विजांचा गडगडाट व लखलखाट आणि मुसळधार पाऊस दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान पडतो. त्याचा जनजीवनावर परिणाम होतोच. अनेक वीज उपकरणे विजांच्या गडगडाटाने व वीजा पडल्याने निकामी होतात.
मान्सूनोत्तर पावसाची चांगली नोंद
दरम्यान मान्सूनोत्तर पावसाची आतापर्यंत चांगली नोंद झाली आहे. सांगेमध्ये 4 इंच, वाळपईत 3 इंच, सांखळीत दोन इंच, पणजीत 1 इंच, म्हापसा व पेडणेमध्ये प्रत्येकी अर्धा इंच तर काणकोणात 1 इंच पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार दि. 9 ऑक्टोबरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता आहे. आज दि. 6 ऑक्टोबर रोजी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे.









