प्रतिनिधी / कुर्डुवाडी
कुर्डुवाडी माढा येथे ग्रामीण भागातील १३ वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी माढा येथील एका व्यावसायिकावर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती माढा पोलिस ठाण्याचे सहा पोलिस निरीक्षक शाम बुवा यांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलगी ही माढा येथे इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असून सोमवार दि. १३ रोजी दु.१ वा. सुमारास ही पीडित मुलगी शाळेतून दफ्तर घेऊन बाहेर स्टँडजवळील बस स्टॉपवर गेली. त्यावेळी ती आपला कंपास शाळेतच क्लासरुममध्ये विसरून आल्याचे तिच्या लक्षात आल्याने घटनास्थळावरील दुकानाजवळ आपले दफ्तर तिथेच ठेऊन कंपास आणण्याकरीता शाळेत गेली.
दरम्यान त्या दुकानदाराने तिचे दफ्तर उचलून आतमध्ये दुकानात आणून ठेवले. ती कंपास घेऊन परत आल्यानंतर तिला तिचे दफ्तर तिथे दिसले नाही. तिने इकडे तिकडे पाहिले असता तिचे दफ्तर त्या दुकानात दिसले ते आणावयास ती दुकानात गेली असता दुकानदाराने तिला चॉकलेट देऊ केले ते तिने नाकारल्यानंतर तू चॉकलेट का घेत नाही असे म्हणत तिचा त्या दुकानदाराने विनयभंग केला. पीडितेच्या फिर्यादीवरुन संशयित आरोपी संदीप जगदाळे यास पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घोंगडे हे करीत आहेत.









