ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची कबुली, भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेला 27 नोव्हेंबरपासून प्रारंभ
वृत्तसंस्था / सिडनी
बायो-बबल अर्थात जैव-सुरक्षित वातावरणात आयुष्य जगणे अतिशय कठीण असते. माझ्यात फारसे क्रिकेट बाकी राहिलेले नाही, मी फार काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकेन, असे वाटत नाही, ही कबुली आहे ऑस्ट्रेलियन डावखुरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची. स्पर्धेचे प्रसारण हक्क असलेल्या सोनी वाहिनीने आयोजित व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत तो बोलत होता.
‘मी अलीकडेच 34 व्या वर्षात पदार्पण केले आहे. आणखी फारसे खेळत राहीन, असे वाटत नाही. तिशी ओलांडल्यानंतर चपळता कमी होते, हालचाली मंदावणे साहजिक असते. त्यामुळे, स्वतःच्या मर्यादा ध्यानात ठेवणे आवश्यक असते. भारताविरुद्ध खेळताना स्लेजिंग झाले तरी मी त्याकडे दुर्लक्ष करणे पसंत करेन’, असे वॉर्नर म्हणाला. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात 27 नोव्हेंबर रोजी पहिली वनडे खेळवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर वॉर्नर संबोधित करत होता.
‘जेव्हा स्लेजिंग होते, त्यावेळी साहजिकच ताणतणाव वाढतो, एकाग्रता भंगू शकते. शिवाय, यामुळे सहकारी खेळाडूंच्या खेळावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, स्लेजिंग झाले तरी त्याकडे दुर्लक्ष करुन सरस खेळ साकारण्याची मालिका कशी कायम राखता येईल, याकडे लक्ष पुरवायला हवे. मागील काही कालावधीत मी हेच अनुभवले आहे’, असे वॉर्नरने नमूद केले.
मजबूत स्ट्राईक रेट हा प्राधान्यक्रम
मर्यादित धोके स्वीकारत असतानाही मजबूत स्ट्राईक रेट राखणे हा माझा प्राधान्यक्रम असतो, याचाही त्याने येथे उल्लेख केला. ‘प्रारंभी, उत्तम सुरुवात करणे व 50 षटकांचा सामना असल्यास डावाच्या मध्याच्या आसपास फटकेबाजी सुरु करण्यावर माझा भर असतो. सध्याच्या घडीला शक्य तितकी फलंदाजी करत राहणे व उत्तम स्ट्राईक रेट राखणे महत्त्वाचे. माझ्या मते, मागील 1-2 वर्षाच्या कालावधीत मी याची अधिक काटेकोर अंमलबजावणी केली. मी माझ्या वडिलांकडून संयम शिकलो आणि तीच शिकवण आता माझ्या मुलांना देत आहे’, असे हा दिग्गज फलंदाज पुढे म्हणाला.
भारताला रोहितची उणीव जाणवेल
रोहितची गैरहजेरी भरुन काढणे कठीण असेल, असा अंदाज त्याने भारतीय संघाबाबत बोलताना व्यक्त केला. ‘भारतीय संघात रोहित हा महत्त्वाचा फलंदाज आहे आणि त्याच्याशिवाय खेळणे आव्हानात्मक असेल. पण, तरीही केएल राहुल, शिखर धवन, मयांक अगरवाल यांच्यासारखे फलंदाज बहरात आहेत, त्यांनी आयपीएल खेळली आहे, त्यामुळे, ते रोहितची कसर भरुन काढण्याचा प्रयत्न करु शकतात’, असे, वॉर्नर पुढे म्हणाला.
भारतीय कर्णधार विराट कोहली ऍडलेडमधील पहिल्या कसोटी सामन्यानंतर आपल्या पहिल्या अपत्याच्या स्वागतासाठी मायदेशी परतत आहे, या निर्णयाचे वॉर्नरने कौतुक केले. उपकर्णधार अजिंक्य रहाणेमुळे भारतीय कसोटी संघ बराच समतोल भासतो आणि विराट मायदेशी परतल्यानंतर रहाणे संयमाच्या गुणामुळे उत्तम समन्वय साधू शकेल, असा त्याचा होरा आहे. वॉर्नरच्या खात्यावर वनडे क्रिकेटमध्ये 5303 धावा आहेत.