तेलंगणात टीआरएसला झटका – भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलंगणा राष्ट्र समितीचे वरिष्ठ नेते आणि माजी आरोग्य मंत्री ई. राजेंद्र यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी टीआरएस सदस्यत्वाचाही राजीनामा दिला होता. हुजूराबाद मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे राजेंद्र हे सत्तारुढ टीआरएसच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत.
पक्षाध्यक्षांकडेच राजीनाम्याचे पत्र सोपविण्याची इच्छा होती. पण त्यांना भेटू शकलो नाही. अशा स्थितीत विधानसभा सचिवांकडे राजीनाम्याचे पत्र सोपवावे लागल्याचे राजेंद्र यांनी म्हटले आहे. अनेक हितचिंतकांनी राजीनामा देण्याचा सल्ला दिला. स्वतःचा मतदारसंघ आणि तेलंगणाच्या लोकांच्या आत्मसन्मानामुळे मी हा निर्णय घेतल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या उपस्थितीत 14 जून रोजी राजेंद्र हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची त्यांनी भेट घेतली होती. भाजप नेतृत्वाने त्यांना पक्षात सामील होण्यासाठी आमंत्रित केले आहे. राजेंद्र यांच्यासह टीआरएसचे आणखीन काही नेते भाजपमध्ये सामील होऊ शकतात.
राजेंद्र यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मालकी हक्काच्या कंपन्यांनी राज्यात जमिनींवर कब्जा केल्याचा आरोप झाला होता. या तक्रारीनंतर राजेंद्र यांना मागील महिन्यात मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आले होते.









