प्रतिनिधी/पुणे
माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचं पुण्यात राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. उद्या, मंगळवारी सकाळी बाणेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. न्यायमूर्ती म्हणून पी. बी. सावंत यांनी अनेक ऐतिहासिक निकाल दिले होते.
पी बी सावंत यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी (एलएलबी) घेतली. त्यानंतर त्यांनी मुंबई हायकोर्ट, सुप्रीम हायकोर्टात न्यायाधीश म्हणून काम पाहिलं. पी बी सावंत १९८९ ते १९९५ या काळात सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती होते. १९९५ मध्ये ते निवृत्त झाले. वर्ल्ड प्रेस कौन्सिल आणि प्रेस कौन्सिल ऑफ़ इंडियाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काही काळ काम पाहिलं.
पी बी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील पहिली एल्गार परिषद पार पडली होती. तसंच मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी नेमण्यात आलेल्या समन्वय समितीचेदेखील ते सुरुवातीच्या काळात अध्यक्ष होते. मात्र मतभेद तसंच प्रकृतीच्या कारणामुळे नंतर त्यांनी जबाबदारी सोडली होती.
Previous Articleदिल्लीत 150 नवे कोरोना रुग्ण; 2 मृत्यू
Next Article विंग कमांडरकडून महिला स्क्वॉड्रन लीडरची छेडछाड









