वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू आणि भरवशाचा फलंदाज ग्रॅहम थॉर्पची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर एका खासगी रूग्णालयात वैद्यकीय उपचार चालू असल्याची माहिती इंग्लंडच्या व्यावसायिक क्रिकेटपटू संघटनेतर्फे देण्यात आली.
52 वर्षीय थॉर्पने अलिकडेच अफगाण संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली होती. गेल्या डिसेंबर-जानेवारी महिन्यात ऍशेस मालिकेत इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाने 4-0 असा पराभव केल्यानंतर थॉर्पने इंग्लंडमधून अफगाण येथे जाण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या काही दिवसापूर्वी थॉर्पेची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या मार्चमध्ये अफगाण क्रिकेट मंडळाने थॉर्पची प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. थॉर्पने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत इंग्लंडकडून 100 कसोटी सामने खेळताना 44.66 धावांच्या 16 शतकांसह 6744 धावा जमविल्या आहेत. तसेच त्याने 82 वनडे सामन्यात इंग्लंडचे प्रतिनिधीत्व केले. इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धेत तो सरे संघाकडून खेळत होता. ऑस्ट्रेलियात त्याने न्यू साऊथ वेल्स संघाला मार्गदर्शन केले आहे.









