उपसरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव
प्रतिनिधी /मोरजी
मांदे उपसरपंच चेतना पेडणेकर यांच्या विरोधात एकूण सात पंच सदस्यांनी अविश्वास ठराव आणल्यामुळे मांदे पंचायतीच्या संगीत खुर्चीत औट घटकेचे सरपंच ठरलेल्या महेश कोनाडकर यांच्या उचलबांगडीनंतर आता उपसरपंचावर गंडांतर आले आहे. त्यामुळे सरपंच निवडीनंतर चर्चेत आलेल्या या पंचायतीत आता उपसरपंच पदही चर्चेत आले आहे. आता ही उपसरपंच पदाची माळ पंच तारा हडफडकर यांच्या गळय़ात पडणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
एका महिन्याच्या कालावधीच्या आतच सरपंच आणि उपसरपंच यांना पायउतार होण्याचा प्रसंग आला आहे. तत्कालीन सरपंच महेश कोनाडकर यांना 24 तासाच्या आत अविश्वास ठरावाला सामोरे जावे लागले होते तर 20 दिवसानंतर उपसरपंच चेतना पेडणेकर यांना अविश्वास ठरावाला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या विरोधात तारा हडफडकर, प्रशांत नाईक, मिशेल, रॉबर्ट फर्नांडिस, मिंगेल फर्नांडिस, किरण सावंत, अमित सावंत आदींनी अविश्वास ठरावाच्या बाजूने सह्या केल्या आहेत.
एकूण 11 पंच सदस्य असलेल्या पंचायत मंडळावर सुरुवातीला माजी आमदार दयानंद सोपटे यांनी आपला गट तयार करून महेश कोनाडकर यांची बिनविरोध सरपंच म्हणून तर उपसरपंच म्हणून चेतना पेडणेकर यांची निवड केली होती. त्यानंतर लगेच 24 तासाच्या आत सरपंच महेश कोनाडकर यांच्यावर एकूण सात पंच सदस्यांनी अविश्वास ठराव आणून पंचायत क्षेत्राच्या इतिहासामध्ये एक नवा अध्याय रचला. अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर आठ दिवसांपूर्वी अमित सावंत यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर आता उपसरपंच चेतना पेडणेकर यांच्यावर अविश्वास ठरावाची नोटीस देऊन त्यांच्या जागी माजी सरपंच तथा विद्यमान पंच तारा हडफडकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. अविश्वास ठरावाची नोटीस पेडणे गट विकास अधिकारी केदार यांच्याकडे 13 रोजी सादर केली.









