नॉन फिचर विभागाचे ज्युरी पबन कुमार यांचे मत
प्रतिनिधी / पणजी
नॉन फिचर विभागात 143 चित्रपट आले होते त्यातून स्क्रीनिंगसाठी 20 लघुपटांची निवड करण्यात आली. परंतु या निवड प्रक्रियेत डॉक्युमेंटरींचे प्रमाण कमी तर लघुपटांचे प्रमाण जास्त होते. डॉक्युमेंटरी म्हणजेच माहितीपटांची संख्या वाढणे आवश्यक आहे. महोत्सवामध्ये माहितीपटसुद्धा महत्त्वाचे आहेत. महोत्सवामध्ये नवीन व तरूण फिल्ममेकर येत आहेत. सांड की आँख हा चित्रपटही एका तरूण दिग्दर्शकाची निर्मिती आहे. महोत्सवामध्ये सुमारे 50 टक्के हे तरूण फिल्ममेकर्स आहेत. असे मत इंडियन पॅनोरमाच्या नॉन फिचर विभागाचे ज्युरी पबन कुमार यांनी 51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.
यावेळी इंडियन पॅनोरमाच्या फिचर विभागाचे ज्युरी जॉन मॅथ्यू मॅथन, श्री दत्ता उपस्थित होते.
कोरोना काळात केंद्र सरकारने आंचिम आयोजित केले हे कार्य कौतुकास्पद आहे. इंडियन पॅनोरमा विभागातील चित्रपट उत्कृष्ट आहेत. एकूण 180 चित्रपटांचे प्रवेश आले होते. त्यातून 60 चित्रपटांची निवड करण्यात आली. या विभागाचा पडदा सांड की आँख चित्रपटाने उघडला. याचा निर्णयही सर्व ज्युरींच्या एकमताने झाला. हा चित्रपट वास्तववादी आहे. भारतीय महिलांना प्रोत्साहन अशाप्रकारचा चित्रपट आहे असे जॉन मॅथ्यू मॅथन यांनी यावेळी सांगितले.
सांड की आँख हा चित्रपट समाजातील पडदा व्यवस्थेवर आधारित आहे. ज्याप्रकारे या चित्रपटातील महिला सबलीकरणासाठी धडपडतात त्यातून देशातील सर्व महिलांना एक नवीन प्रोत्साहन चित्रपटातून मिळणार आहे. सर्व प्रकारे हा चित्रपट ज्युरींच्या मनाला भावला आणि इंडियन पॅनोरमाची ओपनिंग फिल्म म्हणून निवड करण्यात आली अशी माहिती ज्युरी संघमित्रा चौधरी यांनी यावेळी दिली.









