प्रतिनिधी / पणजी
महिलांनी आपले अस्तित्व सिध्द करायला पाहिजे. समाजात सुरू असलेल्या विविध विषयांबद्दल महिलांना माहिती असणे महत्वाचे आहे. त्या विषयांमध्ये भाग घेणे, त्यावर आपली मते मांडणे यातुनच महिलांचे मत पुढे येऊन समाजात बदल होऊ शकतो. सरकारी धोरण ठरवितानाही ही मते विचारात घेतली जाऊ शकतात. जितकी माहिती आहे, त्यातच समाधान न मानता महिलांनी सर्वंकषपणे विचार करावा, असे मत सेल्फ हॅल्प ग्रुप फॅडरेशनच्या अध्यक्षा सुलक्षणा सावंत यांनी व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गोवा राज्य महिला आयोगातर्फे इन्स्टिटय़?ट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुलक्षणा सावंत प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. व्यासपीठावर महिला व बाल कल्याण संचालनालयाच्या संचालक दिपाली नाईक, आयोगाच्या अध्यक्षा डॉ. विद्या गावडे उपस्थित होत्या. कार्यक्रमात केपे येथील विशाखा वेळीप व डॉ. नंदिता डिसोझा यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ’मेन फॉर वुमन’ या विषयावर कार्यक्रमात चर्चासत्रही झाले.
सुलक्षणा सावंत म्हणाल्या, की जो बदल आपण समाजात पाहतो, तो बदल आधी स्वतः मध्ये केला पाहिजे. महिला जागतिक स्तरावर विविध क्षेत्रात आपले स्थान कायम करीत आहेत. त्याचबारेबर महिला आजही आपल्या समाज हक्कासाठी भांडत आहे. शारीरिक, मानसिक, आर्थिक व सामाजिक सुरक्षा महिलांच्या वाटचालीत अडथळे आणतात. त्यामुळे या गोष्टींमध्ये महिलांनी आपली बाजू बळकट केली पाहिजे.
डॉ. विद्या गावडे म्हणाल्या, की समाजात आजच्या घडीला घरगुती हिंसाचाराची प्रकरणे वाढली आहेत. दर दिवसाला महिलांच्या घरगुती हिंसाचाराची 4 ते 5 प्रकरणे नोंद होतात. आयोगाकडून महिलेला शक्मय तितकी मदत आम्ही करतो. पुरुषांनी महिलांच्या समानतेसाठी पुढे येणे गरजेचे आहे. महिला आणि पुरुषांमध्ये ’आदर देणे आणि आदर घेणे’ अशी वागणुक असायला हवी. महिला आयोगाकडून तळागाळातील महिलांसाठी 18 ते 20 जनजागृती उपक्रम राबविण्यात आले व त्यांना प्रतिसादही उत्फर्त मिळाला.
दिपाली नाईक म्हणाल्या, की महिलांसाठी सुमारे 37 विविध सरकारी योजना आहेत. महिलांनी या योजनांचा लाभ घेऊन स्वतःच्या पायावर उभर रहायला पाहिजे. महिलांनी स्वतःला कमी समजून अत्याचाराला बळी न पडता, या विरोधात आवाज उठविणे महत्वाचे आहे. महिलांसाठी 181 हा हॅल्पलाईन क्रमांक आहे. त्यावर त्या संपर्क करून त्या मदत मागु शकतात. कुटुंबात सर्वप्रथम मुलगा व मुलगी यात भेदभाव करु नये.
सिध्दी उपाध्ये यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संगीता परब यांनी आभार मानले.









