प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक सरकारच्या उच्चशिक्षण विभागाने 17 नोव्हेंबर रोजी सर्व महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक केंद्रीय गृह मंत्रालय अद्याप महाविद्यालये सुरू करण्याबाबत विचारविनिमय करत आहे. मात्र, राज्य सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे. केंद्र सरकारने अनलॉक 5.0 च्या गाईडलाईननुसार 30 नोव्हेंबरपर्यंत शाळा-महाविद्यालये सुरू करू नयेत, असे स्पष्ट केले आहे.
अर्थात राज्य सरकारच्या धोरणानुसार महाविद्यालयांनी विद्यार्थी येण्याबाबत तयारी सुरू केली आहे. शैक्षणिक संस्था सुरू करण्याबाबत केंद आणि राज्य सरकार यांच्यामध्ये एकमत नसले तरी राज्य सरकारने 17 तारखेपासून महाविद्यालये सुरू करण्याबाबत सूचना दिली आहे.
सध्या राज्य सरकारने शैक्षणिक संस्थांसमोर ऑनलाईन वर्ग किंवा प्रत्यक्ष वर्ग असे दोन पर्याय दिले आहेत. तथापि, वसतिगृहातील मुलांच्याबाबत निर्णय घेताना किती मुलांनी वसतिगृहाची सुविधा घेतली आहे त्यावर शैक्षणिक संस्था निर्णय घेतील. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात येताना कोविड 19 च्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.









