मुंबई / ऑनलाईन टीम
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत सचिन वाझे यांच्या पत्रावरून राज्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवरून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. गेल्या ३० दिवसांमध्ये महाराष्ट्रात अशा उलथापालथी होत आहेत, रोज इतके नवनवे खुलासे होत आहेत की त्यांचा ट्रॅक ठेवणं देखील कठीण जात आहे. एक तर स्पष्ट झालं आहे की ही महाविकास आघाडी नसून महावसूली आघाडी आहे. यांचा किमान समान कार्यक्रम म्हणजे पोलिसांकरवी पैसा गोळा करा, लुटा हाच यांचा एकमेव कार्यक्रम सुरू आहे. महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरं निघाली आहेत , अशा शब्दांत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाविकास अघा़डी सरकारवर हल्ल चढवला आहे.
यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, गेल्या ३० दिवसांमध्ये महाराष्ट्रात अशा उलथापालथी होत आहेत, रोज इतके नवनवे खुलासे होत आहेत की त्यांचा ट्रॅक ठेवणं देखील कठीण जात आहे. इतकं महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम महावसुली आघाडी सरकारनं केलं आहे. सचिन वाझे प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरं निघाली आहे. सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार उरलेला नाही.
पोलीस बॉम्ब ठेवतात हे प्रकरण जगातलं एकमेव प्रकरण असावं. मंत्र्यांनी पोलिसांना वसुली करायला लावणं हे अतिशय गंभीर असून पोलिसांना वसुली करायला लावणं हाच राज्य सरकारचा कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे. सचिन वाझे प्रकरणात इतकं काही घडत असताना राज्याचे मुख्यमंत्री अद्याप गप्प का आहेत? त्यांनी सुरुवातीला वाझेचं समर्थन कशासाठी केलं होतं? शिवसेनेला जनतेच्या प्रश्नांना सामोरं जावंच लागेल. महाविकास आघाडी सरकार हे जनतेनं निवडून दिलेलं सरकार नाही. हे सरकार फक्त वसुली सरकार आहे. जनतेनं भाजप आणि शिवसेना युतीला मतदान करुन कौल दिला होता. पण शिवसेनेनं गद्दारी करुन विरोधी पक्षाला हात मिळवला आणि जनतेनं दिलेल्या मतदानाचा अपमान केला, अशी टीका जावडेकर यांनी यावेळी केली.