होमग्राऊंडवर किरणच्या खांद्यावर अपेक्षेचे ओझे
फिरोज मुलाणी /औंध :
चार वर्षाच्या कालावधीनंतर मोठय़ा आत्मविश्वासाने तो आखाडय़ात परतलाय. आकडी या हुकमी डावावर अनेकांना पराभवाचे पाणी पाजण्यासाठी त्याने पवित्रा घेतला आहे. यंदा होमग्राऊडवर जिल्हावासियांच्या अपेक्षेचे ओझे खांद्यावर घेऊन तो महाराष्ट्र केसरीची गदा जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. सातारकरासाठी तो आशेचा “किरण” आहे.
महाराष्ट्र केसरीच्या आखाडय़ात जिंकू किंवा मरू या निर्धाराने उतरणार असल्याचे मोहिचा सुपुत्र किरण भगत याने तरुण भारतला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितले. साताराच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात किरण भगत नाव घेतले तरी अनेकांच्या डोळ्यासमोर सहा फूट उंची आणि मजबूत देहयष्टी लाभलेला तुफानी ताकदीचा किरण डोळ्यासमोर उभा राहतो. राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत त्याने जिह्याचा डंका वाजवला आहे. ऐन भरात मैदानी कुस्तीत त्याने भल्याभल्यांना पराभवाचे खडे चारले आहेत. नगरला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 97 किलो वजनगटात सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. महाराष्ट्र केसरीच्या खुल्या गटातून खेळताना नागपूर आणि वारजे येथे (पुण्यात) विजय चौधरी कडून पराभव पत्करावा लागला होता. भुगावला माती गटातून अंतिम फेरी गाठलेल्या किरणकडून गदेच्या आशा उंचावल्या होत्या. अंतिम फेरीत अभिजित कटकेने पराभूत केल्याने उपमहाराष्ट्र केसरी पदावर समाधान मानावे लागले होते. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत यश हुलकावणी देत असतानाच दुखापतीने किरणला गाठले. गुडघ्याला झालेली दुखापत गंभीर असल्याने तब्बल चार वर्षे कुस्ती पासून बाजुला रहावे लागले होते. दुखापतीमुळे कुस्ती सुटते कि काय अशी स्थिती निर्माण झाली होती. मानसिक द्रुष्या खचलो होतो. मन द्विधा मनस्थितीत होते. कुटुंबातील सर्वजण पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. काही झाले तरी तुला कुस्ती खेळायची आहे. वडीलांनी दाखवलेला आशावाद मला दुखापतीतून सावरण्यासाठी बळ देणारा ठरला. सध्या आँलम्पिकवीर सुमित मलिक यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रसाल आखाडा दिल्ली येथे कसून सराव सुरू आहे. नुकतीच मैदानी कुस्तीत पुण्यात माऊली जमदाडे, राष्ट्रीय उपविजेता मनजीत खत्री, हिंदकेसरी बंटीकुमार, आणि रवि गांधारीयावर मिळवलेल्या विजयामुळे आत्मविश्वास बळावला आहे.मनावरील दबाव झुगारून प्रत्यक्ष मैदानात प्रतिस्पर्ध्याशी भिडल्यामुळे आत्मविश्वास वाढला आहे.
जिल्ह्यातील तमाम कुस्ती शौकीन आणि माणदेशी जनतेच्या माझ्याकडून मोठय़ा अपेक्षा आहेत याची मला जाणीव आहे. मोही ग्रामस्थांचे पाठबळ, ग्रामदैवत महालक्ष्मी आणि शंभु महादेवाचे आशिर्वाद तसेच असंख्य चाहत्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत त्यामुळे यंदा सातारला महाराष्ट्र केसरी किताब जिंकण्यासाठीच आखाडय़ात उतरणार असल्याचे किरणने आत्मविश्वासाने सांगितले.
दुखापतीच्या कठीण काळात परिषदेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी 24 लाख रूपये दिल्याचे आवर्जून सांगितले, माणदेशी फौंडेशनचे प्रभात सिन्हा, माणदेशी एक्स्प्रेस ललिता बाबर, आणि मोही ग्रामस्थ माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. त्यामुळेच मला गंभीर दुखापतीवर मात करता आली.
चाहत्यांचे पाठबळ मलाच…
यंदा कोरोना महामारीनंतर सातारला होयग्राऊंडवर स्पर्धा होत आहे ही माझ्यासाठी जमेची बाजू आहे. कारण घरच्या मैदानात चाहत्यांचे पाठबळ मलाच लाभणार आहे. शिवाय नियमित सराव आणि अखंड परीश्रम सुरू आहेत. त्यामुळे यंदाची स्पर्धा माझ्यासाठी जिंका किंवा मरा अशीच असणार आहे.









