प्रतिनिधी / सातारा :
साताऱ्यात 1963 साली शाहु कला मंदिरात कुस्तीच्या आखाडय़ाचे नियोजन झाले होते. त्यानंतर तब्बल 60 वर्षानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहकार्याने साताऱ्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहे. या आखाडय़ाचे उद्घाटन मंगळवार दि. 5 रोजी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते होणार आहे तर समारोप दि. 9 रोजी राष्ट्रवादीचे सर्व्हेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. सातारकरांनी आर्वजून या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन संयोजनकर्त्यांच्यावतीने सुधीर पवार, ललित लांडगे, दीपक पवार यांनी केले आहे.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद व सातारा जिल्हा तालिम संघ यांच्याववतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा तालिम संघाचे आणि कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना सुधीर पवार म्हणाले, साताऱ्यात होणाऱ्या 64 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेकरता 45 संघाचे 900 मल्ल हजर राहणार आहेत. 150 पंच काम पाहणार आहेत. शाहु क्रीडा संकुलाला असलेल्या दोन प्रवेशद्वारास श्रीरंग आप्पा जाधव आणि ऑलिपिक विजेते खाशाबा जाधव यांचे नाव देण्यात आले आहे. सातारा जिल्ह्याला कुस्तीचा वारसा आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर खाशाबा जाधव, श्रीरंग अप्पा जाधव यांनी नाव केले. तसेच बिजिंग येथे रहिमतपूरचे बाबूराव चव्हाण यांनी नाव केले. पाकिस्तानातही कुस्ती करणारे उमर पैलवान, पापा पैलवान हे आहेत. त्यांनी कराची येथे कुस्ती आखाडय़ात सहभाग घेतला होता.
1963 साली महाराष्ट्र केसरीचा आखाडा साताऱ्यातील छ. शाहु कला मंदिरात घेण्यात आला होता. त्यावेळी स्व. यशवंतराव चव्हाण, लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या सहकार्यातून साहेबराव पवार यांनी घेतला होता. त्यानंतर आता सातारा येथे महाराष्ट्र केसरीचा आखाडा होत आहे. या स्पर्धेकरता 3 ते 5 कोटी खर्च येणार आहे. लाल मातीपासून सर्व नियोजनाचा खर्च जिल्हा तालीम संघ करत आहे.









