बेळगाव ः / प्रतिनिधी
राज्यात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाने विकेंड कर्फ्यू लागू केला आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा हद्दीवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सीमाहद्दीवरील शिनोळी फाटा, अतिवाड क्रॉस व चलवेनहट्टी क्रॉस जवळ दिवसभर पोलीस तैनात होते. बेळगाव शहरात नेहमी महाराष्ट्र, गोवा राज्यातील नागरिकांची वर्दळ असते. याकरिता सीमा हद्दीवर पोलीस तैनात करून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. बेळगाव शहरात तसेच कोल्हापूर जिल्हय़ात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तालुक्याच्या सीमेवर अतिवाड क्रॉसवर कोरोना चेकपोस्ट उभारण्यात आला आहे. याठिकाणी विनामास्क प्रवेश करणाऱयांवर पोलीसांकडून प्रतिबंध करण्यात येत आहे. या मार्गावरून नेहमी दोन्ही राज्यातील वाहनधारकांची मोठय़ा प्रमाणात वर्दळ असते. कामानिमित्त नागरिक दरारोज एकमेंकाच्या संपर्कात येत असतात. परराज्यांतून येणाऱया वाहनांची कसून चौकशी करण्यासाठी सीमाहद्दीवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.









