ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्याने राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत तसेच विकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, अशा परिस्थितीत केवळ विकेंड लॉकडाऊन उपयोगी नसून राज्यात 3 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन घोषित करावा ही मागणी आज मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहे, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना दिली.
ते म्हणाले, आजपासून विकेण्ड लॉकडाउन सुरु होत आहे. पण रुग्णसंख्या ज्या पद्धतीने वाढत आहे हा आकडा पुढील 10 दिवसांत महाराष्ट्रात 10 लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात पूर्णच लॉकडाऊन करावा लागेल.
तसेच रेल्वेवर देखील निर्बंध आणावे लागतील, गर्दी कुठेही होणार नाही हे पहावे लागेल असे संकेत ही त्यांनी यावेळी दिले. कारण नागरिकांचा जीव अमूल्य आहे , ते वाचविण्यासाठी कठोर निर्णय घ्यावेच लागतील असेही त्यांनी म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले की, परिस्थिती हाताळण्यासाठी कितीही उपाययोजना केल्या तरी मनुष्यबळ कमी पडणार आहे. डॉक्टर, नर्सेस कमी पडतील. साडे पाच हजार डॉक्टर जे आता अंतिम परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना ठिकठिकाणी कामाला लावत होतो, तरीदेखील मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे विकेंड नाही तर मी मुख्यमंत्र्यांना तीन आठवड्यांचा कडक लॉकडान आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.