तरुण भारत ऑनलाइन टीम
पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकीत भाजपाला मोठं यश मिळालं आहे. या यशाबद्दल भाजप नेते हा उत्साह साजरा करत आहेत. तसेच महाराष्ट्रातही सत्तांतर होणार असं भाजप नेते म्हणत आहेत.यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपाला टोला लगावला आहे. उत्साहाच्या भरात महाराष्ट्र जिंकण्याचा दावा करणे चुकीचे असं जयंत पाटील यांनी म्हंटल आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
उत्तर प्रदेशमध्ये मायावतींना मतं अधिक पडली आहेत. सर्व पक्ष उत्तर प्रदेशमध्ये एकवटले असते तर विजय झाला असता असा दावा करतानाच भाजपच्या हातातूनही अनेक राज्य गेली होती असंही जयंत पाटील म्हणाले आहेत. महाराष्ट्राची मानसिकता वेगळी आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला धोका नाही असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करायला हरकत नाही परंतु भाजपमधील लोकांवरही कारवाई व्हावी. आम्ही भाजपची यादी दिली आहे कारवाई व्हावी असे जाहीर आव्हानही जयंत पाटील यांनी दिले. देश चालवायची जी चुकीची पद्धत आहे त्याचा विरोध करायला हवा त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवे असे आवाहनही जयंत पाटील यांनी केलं आहे.