ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी देखील राज्यात डिसेंबरमध्ये तिसऱ्या सौम्य लाटेचा धोका आहे. त्यामुळे राज्य सरकार अलर्ट आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्रात नवी नियमावली लागू करण्यात आली आहे.
या नव्या नियमानुसार, लोकल ट्रेनप्रमाणे एसटी, बससेवा, टॅक्सी, रिक्षा या सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करायचा असेल तर दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच रिक्षा, टॅक्सीत बसलेल्या प्रवाशाने मास्कचा वापर केला नसेल तर प्रवाशाला 500 रुपये आणि रिक्षा-टॅक्सी चालकालाही 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. दुकानात आलेल्या ग्राहकाने मास्क घातला नसेल तर ग्राहकाला 500, तर संबंधित दुकानदाराला 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. मॉल्समध्ये ग्राहकांच्या चेहऱ्यावर मास्क नसेल तर मॉल्सच्या मालकाला तब्बल 50 हजार रुपयांचा फटका बसणार आहे.
एखाद्या बंदीस्त ठिकाणी होत असलेल्या कार्यक्रमास, चित्रपटगृहात, नाटय़गृहात, कार्यालयात, हॉलमध्ये तेथील क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीस परवानगी असेल. त्या ठिकाणी कोरोना नियमावलींचे पालन अनिवार्य आहे. अन्यथा आयोजकांना 50 हजारांच्या दंडासह कार्यक्रम बंद करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय ठिकाणांवरून राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी केंद्र शासनाने सूचना केलेल्या आहेत. सर्व देशांतर्गत प्रवासी हे पूर्णपणे लसीकरण झालेले असावेत किंवा त्यांची 72 तासांसाठी वैध असलेली आरटीपीसीआर टेस्ट झालेली असावी.