वृत्तसंस्था/ मुंबई
महाराष्ट्र राज्य कबड्डी असो दरवर्षी ‘कबड्डीमहर्षी’ शंकरराव (बुवा) साळवी यांचा जन्मदिवस ‘कबड्डी दिन’ म्हणून साजरा करते. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेला संलग्न विविध जिह्यात गेली 20 वर्ष हा कबड्डी दिन साजरा केला जात आहे. यंदा मात्र महाराष्ट्रात पसरलेल्या कोरोनाच्या साथीमुळे राज्य असो. च्या पदाधिकाऱयांनी हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला.
हा कार्यक्रम जरी रद्द केला असला तरी कबड्डी दिन मात्र साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. दि. 15 जुलै रोजी सायं. 5.30 वा. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर येथील राज्य कबड्डी असो.च्या कार्यालयात राज्य कबड्डी असो.चे कार्याध्यक्ष व खासदार गजानन कीर्तिकर यांच्या शुभहस्ते बुवांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात येईल. याच बरोबर सर्व संलग्नग्न जिल्हा संघटनांनी देखील आपल्या जिह्यात, तालुक्यात ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी शासनाच्या आदेशाचे पालन करून हा ‘कबड्डी दिन’ साजरा करून बुवांच्या कार्याला मानवंदना द्यावी, असे आव्हान राज्य संघटनेचे सचिव आस्वाद पाटील यांनी या पत्रकाद्वारे जिल्हा संघटनांना केली आहे.









