छत्तिसगडमधील नारायणपूरमध्ये ‘आयटीबीपी’च्या पथकावर नक्षलवादी हल्ला- जवानांकडील रायफल-जॅकेटची लूट
रायपूर / वृत्तसंस्था
छत्तिसगडच्या नारायणपूर भागात आयटीबीपीचे जवान आणि नक्षलवादी यांच्यात शुक्रवारी दुपारी चकमक उडाली. या चकमकीत ‘आयटीबीपी’चे सहायक कमांडंट सुधाकर शिंदे यांच्यासह अन्य एका अधिकाऱयाला वीरमरण पत्करावे लागले. हुतात्मा झालेले सहायक कमांडंट सुधाकर शिंदे हे महाराष्ट्रातील नांदेड जिल्हय़ातील रहिवासी आहेत. हल्ला केल्यानंतर नक्षलवाद्यांनी आयटीबीपीच्या जवानांची एके-47 रायफल आणि 2 बुलेटप्रूफ जॅकेट पळवून नेली आहेत. या चकमकीनंतर नारायणपूरसह परिसरात अतिरिक्त फौजफाटा पाठविण्यात आला असून जंगलभागात शोधमोहीम व्यापक करण्यात आली आहे.
नक्षलवाद्यांनी शुक्रवारी छत्तिसगडच्या नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांवर हल्ला केला. या हल्ल्यात आयटीबीपीच्या सहाय्यक कमांडंटसह दोन सैनिक हुतात्मा झाले. नारायणपूर-बारसूर रस्त्यावर सुरक्षा दलांच्या विशेष पथकावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात सहाय्यक कमांडंट सुधाकर शिंदे (नांदेड, महाराष्ट्र) आणि एएसआय गुरमुख (पंजाब) नक्षलवादी हल्ल्यात हुतात्मा झाले. हुतात्मा झालेले दोघेही ‘आयटीबीपी’च्या 45 बटालियनमध्ये कार्यरत होते. हल्ल्यानंतर लष्करी मदत घटनास्थळी पाठवण्यात आली. सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरू केली.
आयटीबीपी कॅम्पपासून 600 मीटरवर हल्ला
नक्षलवाद्यांनी शुक्रवारी दुपारी 12.10 वाजण्याच्या सुमारास हल्ला केला. प्राथमिक माहितीनुसार, आयटीबीपी कॅम्प कडेमेटापासून सुमारे 600 मीटर अंतरावर, नक्षलवाद्यांनी 45 व्या बटालियनच्या पथकावर हल्ला केला. हे पथक या भागाचा विकास करण्यासाठी कार्यरत असल्याची माहिती बस्तरचे आयजी पी. सुंदरराज यांनी दिली. तसेच सहाय्यक कमांडंट सुधाकर शिंदे आणि सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) गुरमुख यांनी शुक्रवारी छत्तिसगडच्या नारायणपूर जिल्हय़ातील आयटीबीपी कॅम्प कडेमेटाजवळ झालेल्या नक्षली हल्ल्यात कर्तव्याच्या ओघात आपले प्राण गमावल्याचे त्यांनी सांगितले.









