कोणताही पदन्यास न करता, बसल्या जागी नुसत्या नेत्रकटाक्षांनी राधा आणि कृष्णातील प्रेमालापाचे दर्शन घडवणे ही सामान्य गोष्ट नाही. एक ते नऊ अंकांचा खेळ, रोमियो-जूलियटचे कूजन, कृष्णाची विविध रूपे, अगदी दूरध्वनीवरील संवाददेखील नृत्यमुद्रांमधून दाखवण्याचे अफलातून कसब असणारे पं. बिरजू महाराज तथा ‘महाराज जी’ हे एक विलक्षण प्रतिभावान कलावंत होते. उत्तर भारतीय नृत्य प्रकारातील कथ्थकमध्ये तर ते निपूण होतेच, पण गायन, वादन आणि काव्य लेखनातही त्यांच्या प्रतिभेने भरारी घेतली होती. माणसाचे जगणे हेच मूळी नृत्य आहे असे ते मानत. ते स्वतः आपादमस्तक नृत्यमय होऊन गेले होते. त्यांचा प्रत्येक अवयव नृत्य करीत असे. बोलक्मया डोळय़ांनी रसिकांशी संवाद साधणे त्यांना सहज जमलेले होतेच, पण त्यांचा पदन्यास, हस्तमुद्रा, मानेचे वेळावणे खरे तर अवघे शरीरच नाचत होते. त्यांचे हे वेगळेपण त्यांच्या वडिलांनी लहानपणीच ओळखले होते. छोटय़ा बिरजूचे लयबद्ध चालणे पाहून त्याच्या वडिलांनी ‘हा मोठा लयकार होणार,’ असे भाकीत वर्तवले होते. नृत्याचे आरंभीचे धडे वयाच्या सहाव्या वर्षांपासून महाराजजींनी गिरवले ते आपल्या वडिलांकडेच. लय आणि गती हाच परमात्मा आहे, असे ते मानत. सतत नृत्यातच रमून गेलेले अभिनव नृत्यसाधक म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल. त्यांचे नृत्य हा नुसता कार्यक्रम नसतो. तो सोहळा असतो. तिथे केवळ एक नर्तक नाचत नसतो, तर शेकडो भावभावनांचे विभ्रम दृश्यमान होत असतात. तिथे महाराज जींच्या पायातील फक्त घुंगरू बोलत नसतात, तर ते सादर करीत असलेली पात्रे ‘मला घ्या, मला घ्या’ असे विनवित रसिकांपुढे साकार होण्यासाठी आसुसलेली असतात. त्यांचे नृत्य पाहणे हा सर्वांगसुंदर सोहळा असतो. ‘त्यांच्या एका कटाक्षाने, झालो धन्य धन्य मी’ अशी रसिकांची अवस्था होऊन जाते. ‘कथन करे सो कथ्थक,’ अशी कथकाची व्याख्या मूर्तिमंत प्रेक्षकसन्मुख होत असते आणि खरे तर त्या व्याख्येपलीकडे ते नर्तन पोचलेले असते. त्यांचे नृत्य पाहणे म्हणजे आपल्याला देवाने डोळे दिल्याचे सार्थक. अभिजातता आणि अभिज्ञतेचा हा संगम. कैवल्यमार्गाचा माहितगार नृत्यगुरू आपल्या कलेतून चिदानंदाचा अनुभव देतो तेव्हा जीवनसाफल्याची अनुभूती येते. शेकडो मैल चालून आलेल्या वारकऱयाला पंढरीच्या विटेवर उभ्या असलेल्या विठुरायाच्या मूर्तीकडे पाहून जे अपार समाधान होते तसे अलौकिक काहीतरी गवसल्याचा आनंद खरा रसिक महाराजजींच्या नृत्यातून घेतो. नृत्य स्वतःच नर्तन करीत असल्याचा हा दिव्यभास असतो. ते संपूर्ण तादात्म्य, ती सायुज्यता अक्षरशः अनुपम, अवर्णनीय असते. पंडित बिरजू महाराजांच्या लौकिक जीवनातील यशाचा आलेख डोळे दीपवणारा आहेच, पण त्यांच्या नृत्याचा आलेख सर्वांगचक्षू करून टाकणारा आहे. किती आणि काय काय साठवावे असे होऊन जाते त्यांचे नृत्य पाहताना. ‘महाराजजी’ म्हणजे कथ्थक नृत्याला पडलेले सुमधूर स्वप्न, असे वाटते. मग संगीत नाटक अकादमी, पद्मविभूषण, कालिदास अशा सन्मानांचीच उंची वाढत जाते. महाराजजी त्या सर्वांच्या वर आहेत. एका ब्रिजमोहन मिश्र या व्यक्तिमत्वात काय काय सामावलेले होते… पंडित बिरजू महाराज तर होतेच. पण सत्यजित रे यांच्या ‘शतरंज के खिलाडी’मध्ये ‘कान्हा मैं तो से हारी’ हे गीत गाणारे गायक, तबला-ढोलकापासून सतार-संतुर-बासरीपर्यंत अनेक वाद्ये वाजवणारे वादक, बृजशाम या नावाने संगीत रचना, काव्य रचणारे कवी अशी अनेक रूपे त्यांच्यात दडलेली होती. कमलहसनसारख्या निपूण कलावंताला ‘विश्वरूपम’मध्ये, माधुरी दीक्षितसारख्या कलावतीला ‘दिल तो पागल है’ आणि ‘देवदास’मध्ये, दीपिका पदुकोन या लोकप्रिय नटीला ‘बाजीराव मस्तानी’मध्ये, सुजाण अभिनेत्री रेखाला ‘उमराव जान’मध्ये नृत्याचे धडे शिकवणारे दिग्दर्शक महाराजजी पुन्हा वेगळेच होते. पं. बिरजू महाराज हे नृत्यामधील तत्ववेत्ते होते. केवळ नर्तकाचेच नव्हे तर सर्वसामान्यांचेही शरीर नृत्य करीत असते, असे ते म्हणत. त्याविषयीची एक कविताही त्यांनी लिहिली होती. जीवनाच्या आरंभाबरोबरच लयीचाही जन्म होतो, हृदयाच्या तालावर अंगप्रत्यांग हलत असते. अगदी श्वासदेखील नृत्य करतो, कधी सावकाश तर कधी धपापून. शरीराच्या लयीची जाण असणारा माणूस या भवसागरातून तरून जातो आणि ज्याला त्याची जाणीव नसते त्याच्या जिण्यात प्राण नसतो, कारण लय-स्वर हाच निसर्गाचाही मूलाधार आहे असे ते म्हणतात. कथ्थक हे भावनृत्य आहे. अलीकडच्या काळात पारंपरिक नृत्यापेक्षा त्याचे ‘फ्युजन’ करण्याकडे कल वाढला आहे. कथ्थकात तालाला महत्त्व आहे, पण हिंदुस्थानी संगीताऐवजी पाश्चात्य तालावर पदन्यास घडवून आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ठुमरी, होरी, बंदिश किंवा तत्सम संगीताखेरीज गझल आणि थेट योगावरही कथकाचे प्रयोग केले जात आहेत. त्यामुळे कथ्थकाचा अस्सल बाज नाहीसा होत आहे. समकालिनत्वाचा मुलामा घेऊन परंपरेला छेद देण्याचा प्रकार महाराजजींना कदापि मान्य नव्हता. त्यामुळेच अगदी तरूणपणी विविध चित्रपटांमध्ये नृत्यदिग्दर्शनासाठी आलेली आमंत्रणे त्यांनी नाकारली. त्यांचे काका लच्छुमहाराजांनी तशी संधीही उपलब्ध करून दिली, पण आयुष्यभर विशुद्ध नृत्यसेवा करणेच त्यांनी पत्करले. नृत्य केवळ मनोरंजन म्हणजे करमणूक करणारे नसते. नृत्य हा एक विचार असतो, एक तत्व असते. निदिध्यास आणि अभ्यास असतो. किडनीचा विकार बळावलेला असताना आणि मधुमेहाने शरीरात घर केलेले असतानाही पंडितजींनी कथ्थकातील सौंदर्य, पावित्र्य, गूढत्व, खोली उलगडून दाखवणे सोडले नाही. अगदी अखेरच्यादिवशीही ते आपल्या नातवंडांसमवेत अंताक्षरी खेळत होते. त्यातील लय दाखवत होते. कथ्थक नृत्यालाच आपला जन्म वाहून घेणारा असा साधक, असा नृत्यगुरू पुन्हा होणे नाही, त्यांना आदरांजली !
**EDS: FILE PHOTO** New Delhi: Kathak maestro Pandit Birju Maharaj at the ceremony of the presentation of the Sumitra Charat Ram Award for Lifetime Achievement (2019)', at Kamani Auditorium in New Delhi. Birju Maharaj died at his home on Monday, Jan. 17, 2022. (PTI Photo/Ravi Choudhary)(PTI01_17_2022_000001B)







