महाराजांचा गोव्यातील इतिहास म्हणजे वरदान. हा इतिहास आणि ऐतिहासिक ठेव जपणार. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन. विठ्ठलापूर साखळीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचे अनावरण.

डिचोली/प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांचे गोव्यातील भुमीसाठी योगदान म्हणजे संपूर्ण गोमंतकासाठी मोठे वरदान आहे. गोव्यातील देवतांची मंदिरे हि छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच अबाधित राहू शकली, त्यांच्या प्रेरणेतूनच राज्य सरकारने उध्वस्त झालेली सर्व मंदिरे पुन्हा उभी करण्याचा संकल्प केला आहे. छत्रपतींमुळे या राज्याला मिळालेले नाव आणि इतिहास हा संस्मरणीय असून हा इतिहास आणि ऐतिहासिक ठेव राखून ठेवण्यासाठी सरकार सदैव कटिबद्ध राहणार. असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विठ्ठलापूर साखळी येथे केले.
विठ्ठलापूर साखळी येथील जय भवनी जय शिवजी मित्र मंडळातर्फे विठ्ठलापूर येथे साकारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री तथा आमदार प्रतापसिंह राणे, विजयादेवी राणे, माजी सरपंचा अपर्णादेवी राणे, प्रेमेंद्र शेट, सुविद्या पित्रे, गोवा विद्यापीठ मराठी विभागाचे प्राचार्य डॉ. विनय मडगावकर, मंडळाचे अध्यक्ष शिवानंद बापे आदींची उपस्थिती होती.
छत्रपतींमुळे या राज्याची संस्कृती आणि वैभव टिकू शकले. त्यांची प्रेरणा म्हणजे राज्यासाठी मोठे वरदान आहे. हे वरदान राखून ठेवताना राज्यात छत्रपतींच्या प्रेरणेने सुराज यावे यासाठी सत्तेवरील सरकार पुन्हा सत्तेवर येणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकांनी मोठा आशिर्वाद दिलाच आहे. व यापुढेही देणार. छत्रपतींचा आदर्श समोर ठेऊन सरकार आणि राज्य चालविण्यास आम्ही सज्ज आहोत, असेही यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुढे म्हटले.

देशाचे नाव उंचावण्याचे काम छत्रपतींच्या प्रेरणेने करावे – प्रतापसिंह राणे.
यावेळी आमदार प्रतापसिंह राणे यांनी आपल्या भाषणात, या भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान लोकनेत्याने जन्म घेऊन केलेल्या कार्यामुळेच आज आम्ही स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत. त्यांनी भारतात आपली एक प्रेरणा ठेवली आहे. एकेकाळी येथे परकीयांची राजवट होती. जय हिंद म्हटल्यास शिक्षा दिली जात होती. छत्रपतींची प्रेरणा आजपर्यंत टिकून आहे. त्यांनी स्वातंत्र्याचे बीज पेरले होते. छत्रपतींसारख्या अनेक मावळय़ांनी आपल्या जिवाची बाजी दिली असून त्यांचेही स्मरणही महत्त्वाचे आहे. आज भारतावरही अनेक संकटे आहेत. त्यातून बाहेर पडण्यासाठी छत्रपतींच्या प्रेरणेची दखल घ्यावी. देशाला चांगले असे कार्य आम्ही करायला हवे. भारत देश महान होऊ पाहत असून देशाला काही नुकसान होणार अशी कामगिरी न करता देशाचे नाव उंचावण्यासारखे काम करायला हवे. या पुतळय़ामुळे तरुण पिढीला प्रेरणा मिळणार आणि या प्रेरणेनेच समाजाचे हित जपण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
छत्रपतींच्या बळावर समाजात चांगली कामगिरी करण्यास सज्ज होऊया – प्रेमेंद्र शेट
छत्रपतींचा इतिहास मनात तेवत ठेवायला हवा. त्याचे शिक्षण पुढील पिढीला देणे आवश्यक आहे. अशी स्मारके गावागावात उभी राहतात तेव्हाच छत्रपतींचा इतिहास आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा मनात तेवत राहते. याच बळावर समाजात चांगली कामगिरी करण्यासाठी तयार रहावे. छत्रपतींचा आदर्श मनात बाळगत समाजात चांगले काम करण्याची तयारी सदैव प्रत्येक मावळय़ाने ठावावी, असे आवाहन यावेळी मयेचे भाजप उमेदवार तथा पंचसदस्य प्रेमेंद्र शेट यांनी केले.
डॉ. विनय मडगावकर यां?नी विषद केला इतिहास
यावेळी मराठी विभागाचे प्राचार्य डॉ. विनय मडगावकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचज गोव्यातील कार्य याचा इतिहास कथन केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श अनेकांनी स्विकारून आपल्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीला योग्य दिशा दिली आहे. गोमंतकाचाही इतिहास गौरवशाली आहे. त्यांचा आदर्श घेऊन समर्पित कार्य करण्यासाठी सज्ज होऊया. असे त्यांनी म्हटले. यावेळी अपर्णादेवी राणे यांनीही विचार मांडले.
छत्रपतींच्या पुतळय़ासाठी योगदान दिलेल्यांचा गौरव.
या कार्यक्रमात प्रशांत देसाई, चंदन च्यारी, उदय जोशी, व्यास जावडेकर, यशवंतराव देसाई, अर्जुन परब, रामदास भोसले, मंदार पित्रे, डॉ. कौस्तुभ पाटणेकर, उमेश काणेकर, उज्वल हळर्णकर, प्रथमेच चोडणकर, तिर्थराज पुजारी, अश्विन देसाई, अरूण नाईक, संदीप नाईक, विशाल भोसले, श्रीराम आमोणकर, गुलशन सावंत, उमेश उसपकर, कृष्णनाथ बांदेकर, शैलेश फातर्फेकर, दत्तगुरु इलेक्ट्रशीयन, सागर सावंत, पवन चोडणकर, संतोष गोसावी यांचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन ऐश्वर्या च्यारी यांनी केले.
ढोल ताशा पथकाने केली वातावरण निर्मिती
या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण पूर्वी उसगाव येथील शिव संस्कृती प्रति÷ान या ढोल ताशा पथकाची कारापूर तिस्क येथून विठ्ठलापूर पर्यंत मिरवणूक घडविण्यात आली. या ढोल ताश पथकातील प्रत्येक कलाकाराने सादर केलेल्या अतीउत्कृ÷ कलेमुळे या परिसरात संपूर्ण वातावरण शिवमय करून सोडले. या पथकासह विठ्ठलापूर भागातील युवक युवती व महिलांनी विशेष पेहराव करून मिरवणूक काढली. त्यामुळे या संपूर्ण वातावरणात अधिकच रंग भरला. विठ्ठलापूर साखळी येथे सचिन पित्रे, पराग पित्रे व मंदार पित्रे यांनी दिलेल्या जागेत उभारण्यात आलेल्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचे अनावरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. समई प्रज्वलित करून तसेच छत्रपतींच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मंडळाचे अध्यक्ष शिवानंद बापे यांनी केले. सुफला पुजारी सूत्रसंचालन केले, तर अंजली फातर्फेकर यां?नी आभार मानले.









