प्रतिनिधी/ बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने 1 नोव्हेंबर रोजी काळादिन पाळण्यात येतो तसेच भव्य सायकलफेरी काढण्यात येते. दि. 25 ऑक्टोबर रोजी महामोर्चा काढला जाणार आहे. महामोर्चा व सायकल फेरीमध्ये सीमाभागातील शिवसैनिक मोठय़ा संख्येने सहभागी होतील, असा विश्वास बेळगाव जिल्हा शिवसेनेच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
गोवावेस येथील जिल्हा शिवसेना विभागीय कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी शिवसेनेचे सीमाप्रश्नासाठीचे योगदान याविषयी माहिती दिली. तसेच शहरप्रमुख दिलीप बैलूरकर यांचे वडील ज्योतिबा बैलूरकर, किरण गावडे यांच्या भगिनी कांचन दळवी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या बैठकीला तालुका प्रमुख सचिन गोरले, जिल्हा संघटक रविंद्र जाधव, महेश टंकसाळी, माजी नगरसेवक राकेश पलंगे, सुनील देसूरकर, संतोष समर्थ, रमेश माळवी, बाळासाहेब डंगरले, प्रसाद काकतकर, राहुल कुडे, वैजनाथ भोगण, विनय कोवाडकर, किरण जायाण्णाचे यांच्यासह मोठय़ा संख्येने शिवसैनिक उपस्थित होते..









