वार्ताहर/ आनेवाडी
लॉकडाऊनच्या काळात फक्त आत्यवश्यक असणाऱया सेवा सर्वसामान्य जनतेसाठी दिल्या जात असताना जमावबंदी व संचारबंदीच्या काळात खुलेआमपणे ग्रामीण भागात गुटखा विक्री केली जात असून, दुकानदारांना देखील गुटखा व्यापारी त्यांच्या दुकानांपर्यंत माल पोहोच करीत आहेत. त्यामुळे एवढय़ा पोलिसांच्या कड़क बंदोबस्त असतानादेखील गुटखा वाहतूक खुलेआमपणे चालू असल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दारू धंदे, हॉटेल व्यवसाय, मटण-चिकन विक्री पूर्णपणे बंद असताना देखील छुप्या मार्गाने हे सर्व धंदे चालू असून पोलिसांना नाकाबंदी सारख्या व कोरोना पॉझिटिव्ह गावच्या सुरक्षिततेसाठी नेमणुक असल्याने अश्या प्रकारचे अवैध धंदे वाढू लागले आहेत. त्यामुळे पोलीस बल कमी पडत असल्या कारणाने गुटखा व्यापारी दुचाकीवरुन मालाची देवाण-घेवाण करीत आहेत. महाराष्ट्र राज्यात आधीच गुटखा बंदी असताना देखील गुटखा विक्री होत होती. परंतु आता लॉकडाऊनच्या काळात तर गुटखा विक्री वाढली आहे. आनेवाडी टोलनाक्यावर दूतर्फा पोलिसांचा खडा पहारा असल्याने टोलनाक्याच्या पुढे गुटखा घेवून जाता येत नाही. त्यामुळे शेजारी असणाऱया गावातील पर्यायी मार्गाचा वापर करून वाई तालुक्याच्या पाचवड, भुइं&जसह अन्य गावच्यापर्यंत गुटखा विकला जात आहे. तसेच सातारापासून जवळ असणाऱया सातारा व जावली तालुक्यातील गावात तसेच आतमधील गावामध्ये दिवसा ढवळय़ा गुटखा विक्री होत आहे.
लॉकडाऊनच्या आधी मिळणारा आरएमडी गुटख्याच्या पूड़ा 950 वरुन आता 1400 पर्यंत त्याची किमत झाली असून, विमल कंपनीचा 150 रूपयांचा पूड़ा 300 तर 220 चा मोठा पुडा आता 400 रुपये पर्यंत गेला आहे. गुटखा दर जरी मोठय़ा प्रमाणात वाढले असले तरी खाणाऱयांची संख्या काही कमी झाली नाही. त्यामुळे 20 रुपये किमतीची आरएमडी पुड़ी 40 रुपयांना विकली जाते. 10 रुपयांचा विमल 15 रुपये, 15 रुपये विक्रीचा 20 रुपये पर्यत दर वाढला तरी गुटख्याची लागलेली सवय काही कमी होताना दिसत नाही. त्यातच मुंबई पुणे वरुन आलेल्या लोकांची त्यात आणखी भर पडल्याने गुटखा व्यवसाय बंदीच्या काळात तेजीत सुरु आहे. गुटखा बंदी असणाऱया राज्यात कर्नाटकसह शेजारील इतर राज्यातून गुटखा येत असल्याने गुटख्याला चांदीचा भाव येवू लागला आहे.








