बसपा प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांचे भावनिक आवाहन
ऑनलाईन टीम / मुंबई :
उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणून असंख्य कोटी कुळांचा उद्धारकर्ते महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना १९५४ च्या पोटनिवडणुकीत भंडारात पराभूत करण्याचे काम काँग्रेसने केले होते. आता बाबासाहेबांच्या अपमानाची परतफेड करण्यासाठी सज्ज व्हा, असे भावनिक आवाहन बसपाचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी गुरूवारी भंडारा येथे केले. ‘संवाद यात्रे’च्या सहाव्या दिवशी त्यांनी आज भंडारा येथे बसपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संबोधित केले.
बाबासाहेबांनी दलित, पीडित, शोषित,वंचितांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आपले जीवन समर्पित केले होते. पंरतु, या महामानवाला निवडणुकीत पराभूत करण्याचे गलिच्छ काम कॉंग्रेसने केले. आता आगामी भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेवर निळा झेंडा फडवल्याशिवाय स्वस्थ बसू नका, असे आवाहन अँड.ताजने यांनी केले. भंडारा जिल्ह्यात पक्षाची ताकद बरीच आहे. केवळ संघटनात्मक सक्रियतेने ही सुप्त ताकद जागृत करता येईल.
याअनुषंगाने सगळे जिल्हापरिषदेचे गटांची जबाबदारी पदाधिकार्यांना वाटून देण्यात आली असून येत्या १ ते ३ सप्टेंबर दरम्यान तिन्ही विधानसभा मतदार संघात ‘कॅडर कॅम्प’चे आयोजन करण्यात येणार असल्याचे अँड.ताजने म्हणाले. भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बसपाचे २० सदस्य निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले. यापूर्वी देखील भंडारामध्ये बसपाने निवडणूक लढवली होती. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत बसपाचा उमेदवार केवळ १४०० मतांनी पराभूत झाला होता. आता सर्व ताकदपणाशी लावून आपले सर्व उमेदवार निवडूण येतील यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
संवाद यात्रेला संबोधित करताना विधानसभा निवडणुकीत १२ हजार मते घेणारे अपक्ष उमेदवार प्रशांत रामटेके यांनी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी मा.प्रमोद रैना तसेच प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थित पार्टीत प्रवेश केला. कार्यक्रमात प्रदेश सचिव जय मेश्राम, जिल्हा अध्यक्ष जागेश बांगर, उपाध्यक्ष सलीम पठाण, महिला संघटनच्या प्रिया शहारे, रेखाताई भुसारी, अरुणा ताई चहांदे, दिनेश गेडाम, अविनाश वानखडे, जिल्हा प्रभारी एल.गजभिये, संजय नासरे यांच्यास जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
- ओबीसी समाजाला संख्येच्या प्रमाणात भागीदारी देवू : प्रमोद रैना
‘जिसकी जितनी संख्या भारी,उसकी उतनी भागीदारी’ यानूसार इतर मागासवर्गीयांना त्यांच्या संख्या आधारे बसपा भागीदारी देईल. भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणत ओबीसी बांधव आहेत. या बांधवांना न्याय देण्याचे काम केवळ सुश्री बहन मायावतीच करू शकतात. सामाजिक तसेच राजकीय भागीदारीसाठी सर्वांनी निळ्या झेंड्याखाली येवून संघटनेला बळ द्यावे, असे आवाहन बसपा प्रदेश प्रभारी प्रमोद रैना यांनी केले. भंडारा जिल्हा परिषदेते बसपाचा केवळ एक सदस्य आहे. पंरतु, येत्या काळात २० सदस्य निवडूण आणण्याची ताकद निर्माण करा, असे आवाहन यावेळी रैना यांनी कार्यकर्तयांना केले.









