खा.शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेक मंत्र्यांची उपस्थिती
प्रतिनिधी/ महाबळेश्वर
महाराष्ट्रातील युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या निमंत्रित पदाधिकाऱयांचे तीन दिवसांचे मार्गदर्शन शिबिर महाबळेश्वर येथील हॉटेल ड्रिमलँडच्या भव्य हॉलमध्ये दि. 23 व 24 रोजी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने युवक पदाधिकाऱयांना मार्गदर्शन, संवाद आणि मंथन यासाठी या शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून केले आहे. त्यास ‘चेतना नव्या युगाची नव्या विचारांची प्रगतशील महाराष्ट्राची’, असे या शिबिराला नाव देण्यात आले आहे, अशी माहिती युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सरचिटणीस श्री. नलावडे, सातारा जिल्हा युवकचे अध्यक्ष तेजस शिंदे, महाबळेश्वरचे उपनगराध्यक्ष अफझलभाई सुतार, महाबळेश्वरचे युवकचे अध्यक्ष रोहित ढेबे, माजी नगराध्यक्षा विमालताई पार्टे, विशाल तोष्णीवाल, सचिन ढेबे व सामाजिक कार्यकर्ते तौफिक पटवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिराबद्दल सांगताना युवा प्रदेशाध्यक्ष शेख पुढे म्हणाले की, या शिबिराला संपूर्ण महाराष्ट्रातील 358 तालुक्यातून तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, महानगरचे अध्यक्ष आणि प्रदेशचे पदाधिकारी असे एकूण सुमारे 550 जणच उपस्थित राहणार असून शिबिराचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दि. 23 रोजी होणार आहे. तर समारोप खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दि. 24 नोव्हेंबरला होणार आहे. तीन दिवस शिबिरात राष्ट्रवादीचे मान्यवर मंत्री, नेते, तज्ञ अभ्यासक विविध विषयांवर युवकांना मार्गदर्शन करणार आहेत.
उपमुख्यामंत्री व युवकांचे प्रेरणास्थान अजितदादा पवार हे प्रशासनातील संवाद या विषयावर मार्गदर्शन करणार असून आधुनिक महाराष्ट्राची जडण घडण या विषयावर खासदार श्रीनिवास पाटील मार्गदर्शन करणार आहेत. ओबीसी व इतर आरक्षणाचे वास्तव व भूमिका यावर विचारवंत हरी नरके, युवा संवाद आतून युवा संघटन मंत्री धनंजय मुंडे, महाराष्ट्राचा स्वाभिमान पवार साहेब, आम्हा तरुणाचा विचार पवारसाहेब- जितेंद्र आव्हाड, सत्ता कशासाठी खा. सुप्रियाताई सुळे, जनसंवादाची जपणूक हाच कार्यकर्त्यांचा भविष्यकाळ- आरोग्यमंत्री राजेश टोपे, राष्ट्रवादी पक्षामार्फत वैद्यकीय सहायता कक्ष चालविला जातो त्याचा युवक पदाधिकाऱयांनी आपल्या भागातील रुग्णांना कस कसा फायदा व्हायला हवा यासाठी कसे काम केले पाहिजे- सहायता कक्षाचे श्री. साबळे व गौतम आगा. युवकांपुढील भविष्यातील आवाहने श्री. सावंत, संघर्ष ही संधी राजकारणात- जेष्ठ पत्रकार विजय चोरमाले, भारतीय संविधान याबाबत माहिती- सुप्रिम कोर्ट आव्हाड वकील, संवाद कला व माध्यमांचा उपयोग- खा. अमोल कोल्हे आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. समारोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे. या शिबिराचे खास वैशिष्टय़ म्हणजे तज्ञांच्या मार्गदर्शनानंतर शिबिरार्थी पदाधिकाऱयांची प्रश्न उत्तरे, तरुणांच्या मनातील प्रश्न, इंटरऍक्शन यांचा विशेष समावेश असणार आहे, अशी माहिती युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी पत्रकारांना दिली.









