प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेची निवडणूक झाली नाही, त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. कामे प्रलंबित पडली आहेत. आता उच्च न्यायालयाने महापालिकेची निवडणूक घेण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. तेव्हा तातडीने महापालिकेची निवडणूक घ्यावी, अशी मागणी माजी नगरसेवक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
महपालिकेची निवडणूक झाली नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. बेळगाव महापालिकेचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश करण्यात आला आहे. जर विकास व्हायचा असेल तर तातडीने महापालिकेची निवडणूक घेणे गरजेचे आहे. गेल्या दीड वर्षापासून निवडणूक घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, न्यायालयात याचिका दाखल होत्या, त्यामुळे निवडणूक घेणे अशक्य झाले होते. आता न्यायालयाने निवडणूक घेण्यास काहीच हरकत नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे तातडीने निवडणूक घ्यावी, अशी मागणी माजी नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱयांकडे केली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी महापौर आणि संघटनेचे अध्यक्ष नागेश सातेरी, जनरल सेक्रेटरी दीपक वाघेला, किरण सायनाक, नीलिमा पावशे, वर्षा आजरेकर, नेताजी जाधव, संभाजी चव्हाण, राजेंद्र हुलबत्ते, मालोजी अष्टेकर, कल्लाप्पा प्रधान, आजाप्पा बडीगेर, बसाप्पा चिक्कलदिन्नी, संजीव प्रभू, विनायक गुंजटकर, सतीश गौरगोंडा यांच्यासह माजी नगरसेवक उपस्थित होते..









