बेळगाव / प्रतिनिधी
शहरातील रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आल्याने प्रवासाचे पर्याय बंद झाले आहेत. परगावात कामानिमित्त गेलेले नागरिक आपल्या घरी परतण्यासाठी प्रयत्नशील आहेत. गोवा येथे कामासाठी गेलेल्या कामगारांची तपासणी करून शहरात विविध ठिकाणी ठेवण्यात आले आहे. हे कामगार आणि झोपडपट्टीत राहणारे रहिवासी अशा 500 हून अधिक नागरिकांना महापालिका प्रशासन अन्न पुरवठा करून त्यांची भूक भागवित आहे.
कामधंदा नाही… घराबाहेर पडायचे नाही… आणि परके शहर… पोट कसे भरायचे? असे प्रश्न परराज्यात काम करणाऱया कामगारांना भेडसावू लागले आहेत. बेळगाव शहरात नोकरीनिमित्त व कामानिमित्त आलेल्यांनादेखील ही धास्ती लागली आहे. अशावेळी आपल्या घरी पोहोचण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालविला आहे. पण संचारबंदीमुळे दळणवळणाची साधने बंद झाली आहेत. बाजारपेठ, व्यवसाय, नोकरी आणि कामधंदा हे सर्वच बंद झाल्यामुळे नागरिकांची मोठी गोची झाली आहे. त्यामुळे पायी चालतच घर गाठण्यासाठी काही कामगारांनी आपला प्रवास सुरू ठेवला आहे. अशीच अवस्था गोव्यात कामासाठी गेलेल्या कामगारांची झाली आहे. दररोज अन्नपुरवठा कोण करणार, असा मुद्दा निर्माण झाल्याने घरचा रस्ता धरलेल्या 300 हून अधिक नागरिकांना कर्नाटक हद्दीवर अडविण्यात आले. जिल्हा प्रशासन व आरोग्य खात्याकडून सर्व नागरिकांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या राहण्याची माहिती तसेच कोठून कोठे चालला आहात, याचा सर्व तपशील घेऊन त्यांची रवानगी समाज कल्याण खात्याच्या वसतिगृहासह विविध ठिकाणी केली आहे.
इंदिरा कॅन्टीनच्या माध्यमातून नाष्टा-जेवण
शनिवारी सायंकाळी त्यांची काही ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बेळगाव शहरात ठिकठिकाणी असलेल्या या कामगारांसह झोपडपट्टीतील रहिवाशांना अन्न मिळणे कठीण झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार अशा नागरिकांना अन्न पुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेवर सोपविण्यात आली आहे. महापालिकेच्यावतीने इंदिरा कॅन्टीनच्या माध्यमातून 500 हून अधिक नागरिकांना सकाळचा नाष्टा आणि दुपारी व रात्रीचे जेवण पुरविण्यात येत आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे बंदिस्त असलेल्या नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये, याची दक्षता घेऊन महापालिकेकडून अन्न पुरवठा केला जात आहे.