शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था : रस्त्याच्या विकासाकडे दुर्लक्ष : महापालिका प्रशासन लक्ष देईल का?

प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील विविध रस्त्यांची दुरवस्था झाली असून महाद्वार रोडचा समावेश यामध्ये झाला आहे. सदर रस्त्याचे रुंदीकरण करून डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर रस्त्याच्या विकासाकडे दुर्लक्ष झाल्याने मुख्य रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खड्डय़ांमध्ये चारचाकी वाहने अडकत असून दुचाकी वाहनांचे अपघात होत असल्याने रस्त्याच्या दुरुस्तीकडे महापालिका प्रशासन लक्ष देईल का? अशी विचारणा होत आहे.
शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत असल्याची घोषणा करण्यात येत आहे. पण प्रत्यक्षात केवळ प्रमुख मार्गांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरणाकडे तसेच दुरुस्तीकडे मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. केवळ प्रमुख रस्त्याच्या काँक्रिटीकरणाने स्मार्ट सिटी बनते का, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
शहरातील अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली असून खड्डय़ांमुळे रस्त्यावरून ये-जा करणे मुश्कील बनले आहे. महाद्वार मुख्य रस्त्याची दैनावस्था झाली असून रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. कपिलेश्वर मंदिरपासून धारवाड रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलापर्यंतचा महाद्वार रोड खड्डय़ांच्या विळख्यात सापडला आहे.
रस्त्यावरील खड्डय़ांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनधारकांना लक्षात येत नाही. परिणामी दुचाकी वाहनांचे अपघात होत आहेत. उड्डाणपुलाजवळ रस्त्यावर एक फूट खोलीचे खड्डे निर्माण झाल्याने या ठिकाणी चारचाकी वाहने अडकत आहेत. सध्या हा रस्ता सर्वांनाच धोकादायक बनला आहे. पादचाऱयांना देखील त्रासदायक बनला असून रस्त्यावरील खड्डय़ांमध्ये पाणी साचत असल्याने ये-जा करणाऱया वाहनामुळे पादचाऱयांच्या अंगावर उडत आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करून डांबरीकरण करण्यात आले. मात्र, याला चार वर्षे झाली असून अद्याप या रस्त्याच्या विकासाकडे पाहण्यात आले नाही. त्यामुळे रस्ता खराब झाला आहे.
रस्त्याची दुरुस्ती करणे अत्यावश्यक
या रस्त्यावरून अवजड वाहनांसह सर्व प्रकारच्या वाहनाची वर्दळ असते. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे. दुरुस्तीकरिता महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करण्यात आले असल्याने दररोज वाहनांचे अपघात होत आहेत. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती कधी होणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. सदर रस्त्याची दुरवस्था झाल्याने तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.









