बेळगाव प्रतिनिधी
संततधार सुरू असलेल्या पावसामुळे नदी, नाले, गटारी तुडुंब भरून वाहत आहेत. तसेच गटारी ओव्हरफ्लो होऊन सर्व सांडपाणी रस्त्यावर येत आहे. महाद्वार रोड येथील संभाजी गल्लीतून नाला गेला आहे. पण हा नाला ओव्हरफ्लो होऊन नागरिकांच्या घरात पाणी येत आहे. येथे साठ वर्षापूर्वी नाल्याचे बांधकाम झाले होते. हा नाला जीर्ण झाला असून गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नाला तुडुंब भरून नागरिकांच्या घरात पाणी येत आहे. येथील रहिवाशांच्या विहिरीत हे सांडपाणी गेल्यामुळे विहिरीचे पाणीदेखील दूषित झाले आहे. गटारी उथळ व निमुळत्या असल्यामुळे जवळपास 30 ते 40 कुटुंबांच्या घरात पाणी शिरले आहे. नागरिकांना आपले घर सोडण्याची वेळ आली आहे. तसेच हे पाणी मोकळय़ा जागेत साचून राहिले असल्यामुळे डेंग्यु, मलेरिया यासारख्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. गेल्या वषी झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरून आर्थिक नुकसान झाले होते. त्यामुळे या वषीही ही परिस्थिती अधिक गंभीर होणार असल्याने येथील रहिवासी धास्तावले आहेत.
येथील नागरिकांनी महापालिकेच्या अधिकाऱयांना सांगून येथील नाल्यांची साफसफाई करून घेतली होती पण ती साफ सफाई योग्य पद्धतीने झाली नसल्यामुळे पुन्हा पाणी तुंबण्याचे प्रकार निदर्शनास आले. गेल्या तीन-चार महिन्यांपासून गेल्या वषीसारखी परिस्थिती उद्भवू नये तसेच यावषी पुन्हा आर्थिक हानी होऊ नये म्हणून महापालिकेकडे निवेदन देण्यात आले. पण महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे येथील रहिवाशी तीव्र संताप व्यक्त करत आहेत.









