ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अहिंसा आणि शांतीचा संदेश देणारा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 72 वी पुण्यतिथी आहे. महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकया नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक दिग्गजांनी राजघाटावर येऊन महात्मा गांधींना श्रध्दांजली वाहिली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त राजघाटावर त्यांना सलामी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटवर जाण्यापूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त ट्विट केले. यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, ‘पूज्य बापूंचे व्यक्तिमत्व, विचार आणि आदर्श आपल्याला सशक्त, सक्षम आणि समृद्ध नवा भारत बनविण्यासाठी प्रेरणा देत राहतील.
महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राजघाटवर जाऊन महात्मा गांधी यांना श्रध्दांजली वाहिली.
दरम्यान, 30 जानेवारी 1948 साली महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली होती. दिल्लीतील बिर्ला हाऊसमध्ये प्रार्थना सभेला जात असताना महात्मा गांधी यांच्यावर नथुराम गोडसेने गोळय़ा झाडल्या.









