घाऊक महागाई दर 12.94 टक्क्यांवर – पेट्रोल-डिझेल दरवाढीचा परिणाम
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि निर्मिती खर्च वाढल्याने घाऊक महागाई दर उच्चांकी स्तरावर पोहोचला आहे. देशातील घाऊक बाजारपेठेत महागाईचा विस्फोट झाल्याचे चित्र आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानुसार एप्रिल महिन्यात 10.49 टक्क्यांवर असणारा घाऊक महागाई दर मे महिन्यात 12.94 टक्क्यांवर पोहोचला आहे. मे महिन्यात महागाईच्या दरामध्ये 2.45 टक्क्यांची वाढ झाली आहे. मे 2020 मध्ये हा आकडा उणे 3.37 टक्के राहिला होता. मंत्रालयाने सोमवारी मे महिन्यातील घाऊक महागाईसह किरकोळ महागाई दराचाही आकडा प्रसिद्ध केला आहे.
कोरोना संकटामुळे आधीच सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. कित्येकांना रोजगार गमवावा लागला आहे. अशा स्थितीत महागाई वाढल्याने संसाराचा आर्थिक गाडा वाहून नेणे अवघड ठरू लागले आहे.
महागाई दरात एक महिन्यात सुमारे 2.45 टक्क्यांची वाढ झाली आहे. यापूर्वी ही वाढ 3.1 टक्के इतकी राहिली होती. कच्चे तेल आणि पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढल्याने हा महागाई दर वाढल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. डाळी, फळे आणि अंडी-मांस यांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे.
मे महिन्यात महागाईचा दर वाढण्यामागील मूळ कारण इंधन दरवाढ आणि लो बेस इफेक्ट आहे. मागील वर्षी मे महिन्याच्या तुलनेत यंदा पेट्रोलियम पदार्थ आणि निर्मिती खर्च अधिक असल्याने महागाईचा दर वाढला असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने म्हटले आहे. कोरोनाच्या लाटेनंतर जगभरातून कच्चे तेल आणि इंधनाची मागणी वाढल्याने इंधनाच्या दरांचा भडका उडाला आहे.
इंधन आणि ऊर्जा क्षेत्रात मे महिन्यादरम्यान महागाई 37.61 टक्क्यांनी वाढली आहे. एप्रिलमध्ये हा आकडा 20.94 टक्के राहिला होता. तर निर्मित उत्पादने देखील मे महिन्यात 10.83 टक्क्यांनी महागली आहेत.
किरकोळ महागाईचाही भडका
देशातील किरकोळ महागाई दर मे महिन्यात 6.30 टक्के राहिला असल्याची माहिती सांख्यिकी मंत्रालयाने सोमवारी दिली आहे. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दराचा एप्रिल महिन्यातील सुधारित आकडा आता 4.29 टक्के करण्यात आला आहे. यापूर्वी हा आकडा 4.23 टक्के इतका होता.
6 महिन्यांमध्ये पहिल्यांदाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 6 टक्क्यांच्या अप्पर मार्जिनपेक्षा किरकोळ महागाई दर अधिक राहिला आहे. यापूर्वी सलग 5 महिन्यांमध्ये हा महागाई दर 6 टक्क्यांपेक्षा कमी राहिला होता. कंझ्यूमर फूड प्राइस इंडेक्स किंवा फूड बास्केटमधील महागाई दर देखील मे महिन्यात वाढून 5.01 टक्के झाला आहे. एप्रिल महिन्यात हा दर 1.96 टक्के राहिला होता.
खाद्यतेलांच्या दरात 30.84 टक्क्यांची वाढ
खाद्यतेलांच्या दरात 30.84 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर अंडय़ांच्या किमती 15.16 टक्क्यांनी महागल्या आहेत. तर मांस आणि माशांच्या किमतीनी 9.03 टक्क्यांनी उसळी घेतली आहे. तर भाज्यांचा महागाई दर उणे 1.92 टक्के राहिला आहे.









