पालक राजाच्या बंदीवासात असलेला आर्यक योगायोगाने चारुदत्ताच्या वाडय़ात पोहचतो. तिथे वसंतसेना आणि राजाचा शालक असलेल्या शकाराच्या गाडय़ांची अदलाबदल होऊन वसंतसेना शकाराच्या आणि आर्यक वसंतसेनेच्या गाडीत बसून जातो. पुढे त्या दोघांच्या नशिबात काय वाढून ठेवलंय हेही पहाणं मनोरंजक ठरेल. सहाव्या अंकातल्या ह्या पुढील प्रवेशात वीरक नावाचा राजाचा एक अधिकारी विविध पहारेकऱयांची नावे घेऊन त्यांना दटावत असतो. कारण आर्यक सर्वांची नजर चुकवून तुरूंगातून पळून गेला हे त्याच्या लक्षात आलेले असते. त्यामुळे राजा घाबरून जातो. कारण
भविष्यवाणीनुसार पालकाच्या राजपदाला धोका असून आर्यक राजा होणार असतो.
वीरक साऱया पहारेकऱयांना आर्यकाला शोधण्यासाठी वेगवेगळय़ा दिशांना पाठवतो. तो स्वतः मात्र चंदनक नावाच्या रक्षकाबरोबर टेहळणीबुरुजावर टेहळणी करण्यासाठी निघतो. कोणत्याही परिस्थितीत आर्यक सापडलाच पाहिजे हे सर्वांना बजावतो. तेवढय़ात चंदनक आर्यकाला कोणीतरी पळवून नेत असल्याचे दिसते. तसे तो वीरकाला सांगतो. वीरक ती पडदानशीन गाडी अडवतो. ती कुठे चालली आहे हे विचारतो. तेव्हा गाडीवान सांगतो, ‘ही गाडी चारुदत्ताची आहे. त्यात गणिका वसंतसेना बसलेली आहे. ती जीर्णोद्यानात चालली आहे.’ चंदनक त्यांना हरकत न घेता जायला सांगतो. पण वीरक त्याचीही झडती घ्यायला सांगतो. चंदनक झडती घ्यायला जातो, तेव्हा आर्यक त्याला शरण जातो आणि अभय मागतो. शरण आलेल्याला अभय देण्याची पद्धत असल्याने तो कबूल करतो. राजा पालकाच्या भीतीने तो अभय द्यावे की न द्यावे अशा दुविधेत पडतो. पण शेवटी चांगल्या गोष्टींची साथ द्यायची असे ठरवून गाडीत वसंतसेना आहे, असे सांगतो. तेव्हा वीरक स्वतः पाहू इच्छितो. तेव्हा चंदनक आपल्यावर अविश्वास दाखवल्यामुळे रागावतो. तो जातिवरून वीरकाला चिडवतो. वीरकही त्याची जात काढतो. दोघांत भांडण जुंपते. शेवटी चंदनक प्रसंगावधान राखून गाडीवानाला जाण्याची परवानगी देतो आणि सांगतो की, ‘वाटेत कुणी विचारले तर सांग की, चंदनक आणि वीरक यांनी गाडी पाहिली आहे. आर्ये वसंतसेने, तुला ओळख पटवण्यासाठी माझी ही तलवार देतो.’ अशा प्रकारे आर्यकाला स्वसंरक्षणासाठी हाती तलवार मिळते. जणू राजा बनण्याचे ते प्रतीकच! तलवार देता देता चंदनक म्हणतो, ‘वसंतसेने, ह्या संकटकाळात मदत करणाऱया ह्या चंदनकाचीही ओळख ठेव, असे प्रेमाने सांगतोय!’ आर्यकही ते करण्याचे मान्य करतो. अशा प्रकारे संकटात सापडलेल्या आर्यकाची सहीसलामत सुटका होते!








