तिसऱया अंकाच्या सुरूवातीला एका याज्ञिकाच्या शिष्याचा प्रवेश होतो. तो यज्ञासाठी दर्भ घेऊन चाललेला असतो. त्यावेळी शकुंतलेची सखी प्रियंवदा त्याला दिसते. तो तिला वाटेतच हटकतो. ती वाळय़ाची उटी आणि कमलपत्रे कुणासाठी नेत आहे याची चौकशी करतो. तेव्हा त्याला कळते की, शकुंतलेला ऊन बाधल्याने तिच्या अंगाची तगमग होते आहे, तो दाह शमवण्यासाठी ती ते नेतेय. मग तिला आणखी काही न विचारता तो प्रियंवदेला जाऊ देतो. तसेच स्वतःही गौतमीमाईकडे अनिष्टहारक यज्ञतीर्थही पाठवून देणार असतो.
दुसऱया प्रवेशात शकुंतलेच्या दर्शनाने अस्वस्थ असलेला राजा तिच्या चिंतनात बुडून जातो. तिला पाहण्याची तीव्र ओढ त्याला लागते. उन्हाच्या वेळी ती मालिनी नदीकाठी आपल्या सख्यांसोबत असेल, तेव्हा तिकडेच जावे असे ठरवते. ती गेली त्या वाटेवरच्या झाडावरून आलेल्या झुळूकेचा स्पर्श त्याला हवासा वाटतो. ह्या लतावेलींनी वेढलेल्या लताकुंजातच असावी असा तर्क करतो. तो वेलींच्या फटीतून बघतो. तेव्हा त्याला पुष्पाच्छादित शिळेवर निजलेली शकुंतला आणि तिच्या सख्या जवळ बसलेल्या दिसतात. तो त्यांची मनमोकळेपणाने चाललेली बोलणी ऐकतो. त्यानंतर सख्यांसोबत बोलत बोलत शकुंतला मंचावर प्रवेश करते. त्या तिला कमलपत्रांनी वारा घालतात. शकुंतलेला बरीच अस्वस्थता आलेली दिसत होती. त्यावरून त्याला वाटते की, माझ्या मनाला जे वाटत आहे, तसेच तिला वाटत असेल
का?
प्रियंवदा अनसूयेला सांगत असते की, राजाच्या दर्शनाने शकुंतलाही बावरल्यासारखी दिसतेय. ती त्याच्यासाठी झुरत तर नसेल ना? असेही तिला वाटते. अनसूया तिला
विचारतेच. शकुंतलेला कसला त्रास होतोय? उन्हाचा की आणखी कसला? कारण विकाराचे कारण कळल्याखेरीज त्यावर उपाययोजना करणे अशक्मय असते! हे बोलणे राजाच्या कानी पडते. तेव्हा त्याला वाटते की, आपल्या मनातलीच शंका ही अनसूया शकुंतलेला विचारतेय. त्याअर्थी मीच असा तर्क मनात करतोय असे नाही. तर शकुंतलेला वाटत असते की, तिचे प्रेम तर इतके प्रबळ आहे की, मनात असूनही ते ती आपल्या सख्यांजवळ बोलू शकत नाही!








