तुम्ही टोमॅटोपासून बरेच पदार्थ केले असतील. टोमॅटो सूप आवडीने प्यायलं असेल. आता याच टोमॅटोचा वापर करून पुरी करून बघा. संध्याकाळचं खाणं म्हणून टोमॅटो पुरी हा पदार्थ तुम्ही करू शकता.
साहित्य : चार मध्यम आकाराचे लाल टोमॅटो, दोन कप कणीक, अर्धा कप रवा, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कोथिंबिर, अर्धा इंच आलं, अर्धा चमचा मिरपूड, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, थोडा ओवा, चवीनुसार जिरेपूड, हिंग, हळद, मीठ आणि तेल.
कृती : टोमॅटोचे बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये वाटून घ्या. सोबत हिरवी मिरची आणि आलंही वाटा. एका पातेल्यात किंवा परातीत कणीक, रवा, कोथिंबिर तसंच सुके मसाले आणि मीठ घालून सर्व घटक नीट मिसळून घ्या. आता यात टोमॅटोची प्युरी तसंच गरजेनुसार पाणी घालून पिठ मळून घ्या. हे पिठ दहा मिनिटं बाजूला ठेवा. कढईत तेल गरम करून घ्या. पिठाचे गोळे करून पुर्या लाटा. या पुर्या सोनेरी रंगावर तळून घ्या. दही आणि हिरव्या चटणीसोबत खायला द्या.









