प्रतिनिधी / मसूर
कराड तालुक्यातील मसूर येथील स्वातंत्र्य सैनिक वसंतराव नागेश पारवे (वय ८५) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने मसूरमधील स्वातंत्र्य चळवळीतील अखेरचा दुवा निखळला. त्यांच्या मागे पत्नी, २ मुले, सहा मुली, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे.
वसंतराव पारवे तथा अण्णा यांचा गोवा मुक्ती संग्रामात सक्रीय सहभाग होता. त्या काळात पोलिसांशी झालेल्या झटापटीत त्यांना दुखापत झाली होती. त्याच्या खुणा ते लोकांना अभिमानाने दाखवत असत. या लढ्यातील योगदानाबद्दल शिवाजी विद्यापीठ, पुणे शहर काँग्रेस, मधुकरराव चौधरी स्मृत्यर्थ त्यांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला होता.
छोडो भारत आंदोलनाच्या वर्धापन दिनानिमित्त ९ ऑगस्ट २०२० रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा भव्य सत्कार होणार होता. परंतु प्रकृतीच्या कारणास्तव ते त्यासाठी जावू शकले नाहीत. त्यांच्या निधनाबद्दल मसूर व परिसरात नागरिकांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. शासनाच्या वतीने गावकामगार तलाठी निलेश प्रभुणे यांनी पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली अर्पण केली.