वाहनचालकांना धोका
वार्ताहर / न्हावेली:
सावंतवाडी-शिरोडा मार्गावरील मळगाव घाटीतील संरक्षक कठडा शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने कोसळला. पावसाळय़ाच्या तोंडावर हा कठडा कोसळल्यामुळे रस्ता खचण्याची भीती निर्माण झाली आहे. घाटीतील संरक्षक कठडे कोसळण्याच्या स्थितीत असल्याचे वृत्त प्रसिद्ध करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मळगाव घाटी वाहनधारकांसाठी धोकादायक ठरली आहे.
शनिवारच्या मुसळधार पावसामुळे मळगाव घाटीतील कठडय़ाचा काही भाग कोसळला. दोन वर्षांपूर्वी हा घाटरस्ता खचल्याने या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू होती. यंदाही पावसाळय़ात अशाच परिस्थितीला तोंड देण्याची वेळ वाहनचालकांवर येणार आहे.
घाटमार्ग वनविभागाच्या हद्दीतून जात आहे. एका बाजूने दरड तर दुसऱया बाजूने खोल दरी अशी परिस्थिती आहे या दरडीवर मोठमोठी झाडे कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहे. याबाबत वन आणि बांधकाम विभागाचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष करण्यात आले. दोन्ही विभागांमध्ये ताळमेळ नसल्याने तसेच कायदे व नियम आड येत असल्याने या रस्त्याच्या सुरक्षिततेकडे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. दोन वर्षापासून या घाटरस्त्याच्या समस्येत वाढ झाली. या ठिकाणी असलेल्या धबधब्यानजीक रस्ता दरीच्या बाजूने खचला होता. बांधकाम विभागाने सद्यस्थितीत त्या ठिकाणी संरक्षक भिंत उभारली आहे. मात्र, ही भिंत अपुरी असल्याने रस्ता खचण्याची भीती कायम आहे.
मान्सूनपूर्व पावसात घाटीच्या शेवटच्या टोकाला दरीच्या बाजूने रस्त्याचा काही भाग कोसळला. त्यामुळे त्या भागात रस्त्यावर दगड रचण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. घाटरस्त्यात ठिकठिकाणी कठडे कोसळलेले आहेत. बांधकाम विभागाचे लक्ष वेधूनही निधी नसल्याचे कारण त्यांच्याकडून दिले जाते. पावसाळय़ाच्या तोंडावर रस्त्याच्था कोसळलेल्या भागांमध्ये काहीच उपाययोजना करता येणार नाही. त्यामुळे हा भाग आणखी कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.









