ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीने अटक केली आहे. तरीही ठाकरे सरकारकडून त्यांचा राजीनामा घेण्यात आला नाही. त्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या भाजपने मलिकांच्या राजीनाम्यासाठी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. मलिकांच्या राजीनाम्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईतील आझाद मैदान येथून धडक मोर्चाला सुरूवात झाली आहे.
भाजपचा हा मोर्चा सुरुवातीला राणीची बाग ते आझाद मैदान असा काढण्यात येणार होता. मात्र, या मार्गात बदल करण्यात आला आहे. हा मोर्चा आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा असा मोर्चा काढण्यात येत आहे. आझाद मैदानापासून या मोर्चाला नुकतीच सुरूवात झाली आहे. भाजपच्या प्रमुख नेत्यांसह हजारो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले आहेत.








